यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेत बेकायदा कोळसाभट्टी! 
पुणे

Pune News | यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जागेत बेकायदा कोळसाभट्टी!

कारखाना प्रशासन वन विभागाबद्दल संशयाची चर्चा : थेऊर, ता. हवेली येथील कारखान्याच्या हद्दीत सुरु होती ३ महिने भट्टी

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: थेऊर, ता. हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीत गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून कोळसा भट्टी सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कारखाना परिसरातून धुराचे लोट उठत असताना आणि मोठ्या प्रमाणात कोळसा निर्मिती सुरू असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधित शासकीय यंत्रणांकडून अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, संबंधित भट्टीपासून हाकेच्या अंतरावर वनविभागाचे कार्यालय असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना गेल्या तीन महिन्यांपासून कथितरीत्या सुरू असलेली ही भट्टी वनविभागाच्या निदर्शनास आली नाही का? की माहिती असूनही दुर्लक्ष केले जात आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कारखाना हद्दीत कोळसा भट्टी सुरू करण्यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे. परवानगी असल्यास ती नेमकी कोणत्या विभागाने दिली? कोणत्या नियम व अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली? परवानगीची मुदत किती आहे? तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात आहे का? याबाबत प्रशासनाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, आवश्यक परवानगी नसल्यास गेल्या तीन महिन्यांपासून ही भट्टी सुरू कशी राहिली? संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत घटनास्थळी पाहणी केली आहे का? केली असल्यास त्याचा अहवाल काय आहे? असे प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

‘आशीर्वाद’ कोणाचा?

तीन महिन्यांपासून भट्टी सुरू असल्याचा आरोप तपासात खरा ठरल्यास, एवढ्या कालावधीत संबंधित यंत्रणांचे लक्ष या प्रकाराकडे का गेले नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे. वनविभागाचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असतानाही कथित बेकायदेशीर उपक्रम सुरू राहतो आणि त्यावर कारवाई होत नाही, हे गंभीर असल्याची भावना पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ भट्टी बंद करण्यापुरती कारवाई न करता, भट्टी सुरू करण्यास परवानगी कोणी दिली, जागा वापरण्याची परवानगी कोणाची, संबंधित कागदपत्रे कोणती, आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि कोणत्या स्तरावर या प्रकरणाची माहिती होती, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि सुरक्षा विभाग काय करतोय?

संबंधित भट्टी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या अथवा ताब्यातील जागेवर सुरू असल्याचा आरोप होत असल्याने कारखाना प्रशासनाची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे. संचालक मंडळाने या भट्टीसाठी कोणती परवानगी दिली आहे का? दिली असल्यास ती कोणत्या ठरावाने अथवा अधिकाराने देण्यात आली? कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना या प्रकाराची माहिती आहे का? कारखान्याच्या सुरक्षा विभागाकडून परिसराची नियमित पाहणी आणि गस्त घेतली जाते का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

कारखान्याच्या हद्दीत तीन महिन्यांपासून कोळसा भट्टी सुरू असूनही हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला नसेल, तर ही सुरक्षा व प्रशासन व्यवस्थेची गंभीर त्रुटी नाही का? आणि माहिती असूनही दुर्लक्ष झाले असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची? याचे उत्तर कारखाना प्रशासनाने देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रदूषणाचा प्रश्नही ऐरणीवर

कोळसा भट्टीमधून निर्माण होणारा धूर, राख आणि इतर उत्सर्जनामुळे परिसरातील हवा व पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.

वनविभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल प्रशासन तसेच यशवंत सहकारी साखर कारखाना प्रशासनाने संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करावी. भट्टीसाठी आवश्यक परवानग्या, जमीन वापराची कायदेशीरता, पर्यावरणीय नियमांचे पालन, भट्टी चालविणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थेची कागदपत्रे आणि कारखाना प्रशासनाची भूमिका यांची तपासणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

वनविभाग जागा होणार का?

चौकशीत नियमांचे उल्लंघन अथवा अनधिकृतपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करावी. आवश्यक परवानग्यांशिवाय भट्टी सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यास ती तातडीने बंद करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

दरम्यान, तीन महिन्यांपासून भट्टी सुरू असल्याचा आरोप, भट्टीला असलेल्या कथित परवानग्या, कारखाना प्रशासनाची भूमिका आणि संबंधित विभागांनी केलेल्या पाहणीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग आणि कारखाना प्रशासनाच्या अधिकृत खुलाशानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

आता वनविभाग जागा होणार का? कारखाना प्रशासन खुलासा करणार का? कथित भट्टीला परवानगी नेमकी कोणी दिली? आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास कारवाई कोणावर होणार? याकडे थेऊर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

योग्य ती कारवाई केली जाईल: वनपरिमंडल अधिकारी

या संदर्भात वनपरिमंडल अधिकारी प्रमोद रासकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की कोळसा भट्टी बाबत आमच्या विभागामार्फत कोणतीही परवानगी दिली नाही परवानगी घेणे आवश्यक आहे तरीही मी तात्काळ पाहणी करून पंचनामा करणार आहे व योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT