महेंद्र कांबळे
पुणे : ‘सांस्कृतिक नगरी’, ‘आयटी हब’ अशा बिरुदावली मिरविणार्या पुणे शहरात दिवसाआड एक महिला वासनेची शिकार होत असल्याचे धक्कादायक वास्तव पोलिसदफ्तरी दाखल असलेल्या नोंदींवरून समोर आले आहे. तसेच, विनयभंगाच्या घटनांमध्ये देखील वाढ होत असून, रोज दोनपेक्षा अधिक महिलांच्या अब्रूवर नराधमांकडून घाला घातला जात आहे.
दरम्यान, एकंदरीत मागील अडीच वर्षांचा विचार केला, तर जून 2025 अखेर तब्बल एक हजार 184 महिलांवर लैंगिक अत्याचार झाला आहे, तर दोन हजार 73 तरुणी, महिला विनयभंगाला बळी पडल्या आहेत.
बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार आणि स्वारगेट बसस्थानक परिसरात झालेली बलात्काराची घटना ताजी असतानाच कोंढाव्यात डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. महिला, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शारीरिक, मानसिक, सामाजिकद़ृष्ट्या सबलीकरण होणे गरजेचे आहे.
परिस्थितीशी धीराने सामना करण्यास, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गंभीर झाले पाहिजे.
घाबरून न जाता लढाऊ वृत्ती जागरूक केली पाहिजे.
स्वसंरक्षणासाठीची साधने कायम जवळ बाळगायला हवीत. कराटे वगैरेसारखे स्वसंरक्षणाचे शिक्षण घ्यायला हवे.
स्त्रीला उपभोगाची वस्तू न समजता पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे.
कुटुंबातील मुलांना लहानपणापासूनच स्त्रीचा सन्मान करण्याचे संस्कार दिले पाहिजेत.
अत्याचार करणारा कोणीही असो, त्याला कडक शासन झाले पाहिजे.
पीडितेला घरातील व्यक्तींनी, सामाजिक संस्थांनी आधार दिला पाहिले. मानसिक पाठबळ दिले पाहिजे.
नागरिकांमध्ये जनजागृती केली गेली पाहिजे. अत्याचारित महिलेनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. कुठल्याही धमक्यांना भीक न घालता पोलिस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. अशा प्रसंगात पीडितेच्या घरच्यांनीही आरोपीला कडक शासन होईपर्यंत तिला मानसिक आधार दिला पाहिजे.बाळासाहेब खोपडे, माजी ज्येष्ठ सरकारी वकील