Winter Pudhari
पुणे

Pune Temperature: पुण्यात थंडीची चाहूल! एनडीए परिसरात पारा १२.६ अंशांवर; यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

पहाटे गारवा, दुपारी उन्हाचा चटका कायम; आगामी आठवड्यात किमान तापमानात चढ-उतार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, रविवारी (दि. ८ नोव्हेंबर) एनडीए भागाचा पारा १२.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यंदाच्या हिवाळी हंगामातील हे नीचांकी तापमान ठरले आहे. राज्यात यवतमाळमध्ये १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या विविध भागांत थंडीची चाहूल लागली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यातील एनडीए परिसरात रविवारी १२.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर, शिवाजीनगर येथे किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस होते. शहराच्या वेगवेगळ्या भागांतील भौगोलिक परिस्थिती, उंची, वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता यामुळे तापमानात फरक दिसून येत आहे.

आठवडाभर तापमानात चढ-उतार

आगामी आठवड्यात पुणे शहरातील किमान तापमानात आणखी मोठी घट होण्याची शक्यता सध्या दिसत नाही. कारण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या ८ नोव्हेंबरच्या अंदाजानुसार, ९ नोव्हेंबरला शिवाजीनगर येथे किमान तापमान १७ अंश, तर १० आणि ११ नोव्हेंबरला १६ अंश राहण्याची शक्यता आहे. १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ते १५ ते १६ अंशांच्या आसपास राहू शकते. आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज आहे.

दिवसा मात्र उन्हाचा चटका

शहरात रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका कायम राहणार आहे. आगामी आठवड्यात कमाल तापमान ३४ ते ३५ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पहाटे गारवा आणि दुपारी उष्णता असे परस्परविरोधी वातावरण पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.

पहाटे गारवा का?

शास्त्रीयदृष्ट्या आकाश निरभ्र असल्यास रात्री पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उष्णता अवकाशात वेगाने उत्सर्जित होते. त्यामुळे पहाटेच्या वेळी तापमान कमी होते. उत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि स्थानिक भौगोलिक परिस्थिती यांचाही किमान तापमानावर परिणाम होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT