पुणे

5-जी तंत्रज्ञानासाठी पुण्याने मारली बाजी; मोजक्या शहरांमध्ये निवड

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात 5-जी तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या काही मोजक्या शहरांमध्ये पुणे शहराचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि परवानग्या तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. राज्यात ऑक्टोबरपासून 5-जी तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. हे तंत्रज्ञान लागू करण्यासाठी राज्याने काही शहरांची निवड केली आहे.

त्यात पुणे शहराचा समावेश असल्याची माहिती आयुक्त कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, याबाबत काही दिवसांपूर्वी राज्य शासनाकडून मुंबईत एक बैठकही घेण्यात आली. त्यात प्रामुख्याने 5- जी तंत्रज्ञान पुरविण्यासाठी संबंधित कंपन्यांना टॉवर्स, केबल डक्ट्स तसेच ट्रान्समीटर्सची गरज लागणार आहे. याशिवाय, केबल टाकण्यासाठी खोदाईकामासाठी परवानगी लागणार आहे. यासाठीच्या सर्व परवानग्या तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

त्यानुसार संबंधित शहरांच्या प्रशासनाकडून त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच 5-जी सेवेसाठी शहरात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी महापालिकेकडून आकारण्यात येणारे खोदाईशुल्क व अन्य शुल्क राज्य शासनच निश्चित करणार आहे. 5-जी तंत्रज्ञानासाठी महापालिका पूर्णपणे तयारीत असून खोदकाम, टॉवर्सच्या उभारणीसह अन्य परवानग्या संबंधित कंपनीकडून अर्ज केल्यानंतर तातडीने पालिकेकडून दिल्या जातील, असेही आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT