पुणे

Pune : लेखापरीक्षकांचे कार्यालय हलविण्याचा अट्टाहास का?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मार्केट यार्डातील सहकार विभागाच्या पुणे जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 च्या कार्यालयाचे उपनगरातील विमाननगर येथील खासगी जागेत करण्यात येणारे गैरसोयीचे स्थलांतर रद्द करून शहरातील पीएमपीच्या जागेत स्थलांतर करण्याची मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाने शासनाकडे केली आहे. मात्र, जादा दर देऊन विमाननगर जागेत कार्यालय नेण्याचा घाट कोणाच्या अट्टाहासापोटी? असा प्रश्न उपस्थित करून स्थलांतरामागे स्वार्थी हेतू असल्याची शंका महासंघाने उपस्थित केली आहे.

स्वारगेट पीएमपी डेपो येथील जागा प्रतिचौरस फूट 35.17 रुपये दराने उपलब्ध असताना विभागातील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी जाणूनबुजून या जागेऐवजी वडगाव शेरी-विमाननगर येथील 60 रुपये चौरस फूट जादा दराच्या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने शासनाचे आर्थिक नुकसान आणि लोकांची गैरसोय होणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.
मार्केट यार्डातील भू-विकास बँकेच्या जागेत सध्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक आणि त्यांच्या अधिन असलेल्या संबंधित सात कार्यालयांच्या जागेचा करारनामा संपला आहे. विमाननगर येथील जागा लेखापरीक्षण कार्यालयीन कामाच्या दृष्टीने सोयीस्कर नसल्याने आणि पुणे शहरापासून अतिशय दूरवर असल्याने हे स्थलांतर रद्द करण्याची मागणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस बाबाराम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे 22 फेब—ुवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

… पूर्वी पीएमपी इमारतीमध्येच होते कार्यालय

स्वारगेट पीएमपी डेपो येथील एकूण 12 हजार 362 चौरस फुटाची जागा 35 रुपये 17 पैसे प्रतिचौरस फूट आणि त्यावर 18 टक्के जीएसटी या दराने उपलब्ध असल्याचे लेखी पत्र दिले आहे. या जागेत वाहन पार्किंगदेखील उपलब्ध असून शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. पीएमटी स्थानक, रिक्षा वाहतूक उपलब्ध असून येत्या दोन महिन्यात मेट्रो सेवाही सुरू होणार आहे. या इमारतीमध्ये सहकार न्यायालय व अन्य शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. मार्केट यार्डात जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे कार्यालय स्थलांतर होण्यापूर्वी याच पीएमटी इमारतीमध्ये ते कार्यरत होते. त्यामुळे शहरापासून दूरवर व गैरसोयीच्या असलेल्या विमाननगर येथे जिल्हा लेखापरीक्षकांचे कार्यालय स्थलांतर न करता स्वारगेट येथील पीएमटीच्या जागेत करण्यास मान्यता देण्याची आमची मागणी असल्याचेही पठाण यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT