Pune Weather Report | यंदाच्या उन्हाळ्यात पुणे शहरात फक्त 18.5 मिमी पाऊस File Photo
पुणे

Pune Weather Report | यंदाच्या उन्हाळ्यात पुणे शहरात फक्त 18.5 मिमी पाऊस

उष्मा वाढल्याने सहन करावा लागला उकाडा

पुढारी वृत्तसेवा

Pune Weather Report

पुणे : दरवर्षी उन्हाळी हंगामात मार्च ते मे दरम्यान शहरात सरासरी 70 ते 80 मिमी पाऊस पडतोच. मात्र, यंदा 1 मार्च ते 11 मे पर्यंतच्या साठ ते सत्तर दिवसांच्या उन्हाळी हंगामात केवळ 18.5 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे उष्म्यात मोठी वाढ झाली आणि पुणेकरांना कमालीचा उकाडा सहन करावा लागला.

यंदाचा उन्हाळा पुणेकरांना फार कठीण जात आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये सरासरी पाऊस पडलाच नाही. शहरात मार्चची सरासरी 17 ते 20 मिमी, तर एप्रिलची पावसाची सरासरी 11 ते 15 मिमी आणि मे महिन्याची सरासरी 48 मिमी इतकी आहे. मात्र, एप्रिलच्या 30 दिवसांत एकही दिवस पाऊस पडला नाही. त्यामुळे प्रचंड उष्मा नागरिकांना सहन करावा लागला.

15 मार्च ते 30 एप्रिल अशी 44 ते 45 दिवस प्रखर उष्णतेची लाट होती. 30 एप्रिल 1897 रोजी शहराचा पारा आजवरचा सर्वाधिक 42.3 अंशांवर गेल्याची नोंद आहे. मात्र, यंदा हा विक्रम एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अनेकवेळा मोडला. शिवाजीनगरचे तापमान 42.6 अंशांवर तीनवेळा गेले, तर लोहगावचा पारा किमान सात दिवस 43 अंशांवर होता.

गत दहा वर्षांत यंदा सर्वांत कमी पाऊस

गत दहा वर्षांची आकडेवारी तपासली तेव्हा असे लक्षात आले की, 2015 ते 2024 या कालावधीत शहरात उन्हाळी हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र, यंदा तो खूप कमी म्हणजे 18.5 मिमी इतका झाला आहे. मे 2023 मध्ये 19.4 मिमी पाऊस पडला, तर मे 2015 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 112.7 मिमी आणि 88.8 मिमी पाऊस पडला. तर मे 2024 मध्ये शहरात 11.2 मिमी पाऊस झाला होता. गेल्या दशकात पुण्याच्या इतिहासातील काही सर्वांत तीव्र पावसाळ्याची नोंद झाली आहे.

शहरात यंदा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत खूप जास्त उकाडा जाणवला, तो असह्य ठरला. कारण, या दोन महिन्यांत जो सरासरी पाऊस पडतो, तो झालाच नाही. मार्चमध्ये केवळ सात मिमी पाऊस झाला, तर एप्रिलमध्ये एकही दिवस पाऊस झाला नाही. मे महिन्यात दोन दिवसांत 11.5 मिमी पाऊस झाला. त्यामुळे एकूण पाऊस 18.5 मिमी इतकी नोंद झाली. मात्र, अजून मे महिन्याचे वीस दिवस बाकी आहेत. पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे मेची सरासरी भरून निघेल, असा अंदाज आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, माजी विभागप्रमुख, आयएमडी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT