पुणे : शहरातील बहुतांश भागात गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 1 ते 1.30 या वेळेत हलक्या पावसाने हजेरी लावल्याने आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. कमाल तापमानाचा पारा 36 अंशांवर खाली आला होता.
शहरात बुधवारी सायंकाळी हलक्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारी 1 च्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस झाला. पावसाचा फार जोर नसल्याने वेधशाळेत पावसाची नोंद झाली नाही.
मात्र, वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाडा कमी झाला. अल्हाददायक वातावरणामुळे सायंकाळी टेकडीवर फिरायला जाणाऱ्यांची गर्दी झाली होती.