Water Supply Cut Pudhari
पुणे

Pune Water Supply Cut: सम-विषम पाणीपुरवठ्याचा फटका; पुणेकरांची पाण्यासाठी धावपळ

धरणांतील घटता पाणीसाठा आणि उशिरा येणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक भागांत कमी दाब, अपुरा पुरवठा आणि टँकरवरील वाढते अवलंबित्व

पुढारी वृत्तसेवा

सुरेश मोरे, दत्तात्रय नलावडे, नितीन वाबळे, माऊली शिंदे, प्रदिप बलाडे, संतोष चोपडे, रवी कोपनर, रघुनाथ कसबे, प्रमोद गिरी, नितीन पवार

पुणे: जून महिना अर्धा सरला, तरीही पावसाला सुरुवात झाली नाही. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने महापालिकेने शहरात पाणीकपात सुरू केली आहे. सम आणि विषम तारखेनुसार प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मंगळवारी (दि.१६) शहर आणि उपनगरांच्या विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. काही ठिकाणी नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले, तर काही ठिकाणी दाब कमी असल्याने नळाला पाणीच आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत दै.’पुढारी’ने घेतलेला हा आढावा..

महंमदवाडी, कोंढवा, केदारीनगर परिसरात महापालिकेच्या सम-विषम पाणीपुरवठा वेळपत्रकाच्या अंमलबजावणीत नियोजनाचा अभाव दिसून येत असून, पाणी वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने आणि पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी न लावल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सम-विषम विभागणी करताना संबंधित भागांमध्ये स्वतंत्रपणे पाणीपुरवठा नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हॉल्व्हची संख्या आणि उपलब्धता पुरेशी विचारात घेतली गेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अनेक ठिकाणी नव्याने व्हॉल्व्ह बसविण्याची गरज असल्याचेही समोर येत आहे. या गोंधळामुळे पहिल्याच दिवशी पाणीपुरवठा व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या. काही भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही, तर कमी दाबामुळे उंच भागांपर्यंत पाणी पोहचलेच नाही. दरम्यान, टंचाईमुळे परिसरात टँकरची मागणी वाढली आहे. महंमदवाडी येथील रहिवासी आनंद शेळके म्हणाले की, पाणी कमी वेळ द्या; पण पुरेशा दाबाने द्या. धरणांमध्ये पाणी कमी आहे, याची जाणीव नागरिकांना आहे. मात्र, पाणीपुरवठा करताना सर्व भागांना समान न्याय मिळावा.

महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, कोल्हेवाडी आणि धायरी परिसरातील नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. आधीच अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत असलेल्या या भागांमध्ये नव्या नियोजनामुळे नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. खडकवासला धरणाच्या परिसरातील ही गावे असूनही अनेक नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे. ठरलेल्या वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पुरवठा होणे आणि उंच भागांतील घरांपर्यंत पाणी न पोहोचणे आदी तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी केवळ एक ते दीड तासच पाणीपुरवठा होत असून तोही कमी दाबाने होत असल्याने पाणी साठविणे कठीण जात आहे. परिणामी दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. कमी दाबाने पाणी आल्याने टाक्या भरणे आणि पाण्याची साठवण करणे ही मोठी कसरत ठरत आहे.महापालिकेकडून पुरेशा दाबाने आणि निश्चित वेळेत पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. धरणाच्या उशाशी असलेल्या गावांमध्येच पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असल्याने प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिका प्रशासनाचे पाणी पुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे फसले आहे. कोंढव्यातील काही भागात नागरिकांना सोमवारी पाणी मिळाले नाही, तर मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. एनआयबीएम परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे
हैबतराव निंबाळकर, रहिवासी,कोंढवा
पूर्वीच दररोज अवघा अर्धा तास पाणी येत होते. आता एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत. कमी दाबामुळे टाकी पूर्ण भरत नाही. त्यामुळे घरगुती गरजा भागविताना मोठी गैरसोय होत आहे.
सुभाष हगवणे, रहिवासी, किरकटवाडी
खडकवासला धरणाजवळ राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागणे ही शोकांतिका आहे. पाणी केवळ तासभर येते आणि तेही कमी दाबाने. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रूपेश घुले पाटील, रहिवासी, नांदेड

महापालिकेने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार घोरपडी परिसरात सम तारखांना, तर मुंढवा भागात विषम तारखांना पाणीपुरवठा होणार आहे. केशवनगर परिसरात पूर्वीप्रमाणेच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याची टंचाई भासू नये यासाठी आतापासूनच साठवणुकीची तयारी सुरू केली आहे. प्लास्टिकचे ड्रम, पाण्याच्या टाक्या, इतर साठवणूक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. महापालिकेने सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लागू केले आहे. त्यानुसार मंगळवारी घोरपडी परिसरात पाणीपुरवठा झाला; मात्र तो कमी दाबाने आणि अपुरा झाल्याची तक्रार नागरिकांनी केली. दुसरीकडे, मुंढवा परिसरात विषम तारखांना पाणीपुरवठा होणार असल्याने मंगळवारी अनेक भागांत नळ कोरडे राहिले. पाणीपुरवठ्याच्या नव्या नियोजनाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, कोणत्या भागात पाणी येणार आणि कोणत्या भागांत येणार नाही, याची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अनेक कुटुंबांकडे पाणी साठविण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांनी तातडीने बाजारपेठेतून पाणी साठवणीची भांडी खरेदी केली.

परिसरात अपुरा, गढूळ आणि अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी केला तरी चालेल; मात्र स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नव्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. काही भागांत नागरिकांना पूर्वीपेक्षा दोन तास लवकर, तर काही भागांत दोन तास उशिरा पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या दैनंदिन कामांचे नियोजन बदलावे लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक भागांत अद्यापही अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर गढूळ व पिवळसर पाणी येण्याची समस्या कायम आहे. या दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटाचे विकार झाल्याची तक्रार आहे. वारंवार तक्रारी करूनही गढूळ पाण्याचे नेमके कारण शोधण्यात पाणीपुरवठा विभागाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अनियमित, अपुरा आणि दूषित पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने पाणीकपातीची घोषणा केल्यानंतर पाणीपुरव ठ्याचे नेमके वेळापत्रक समजून घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात अडचण येऊ नये म्हणून आम्ही पाणी साठविण्याची व्यवस्था केली आहे. सम-विषम तारखांना पाणीपुरवठा होणार असला, तरी पाणी आल्यावर ते पुरेशा प्रमाणात मिळावे, ही अपेक्षा आहे.
बाळासाहेब मोडक, रहिवासी, घोरपडी
मुंढवा परिसरात विषम तारखांना पाणीपुरवठा होणार असल्याने मंगळवारी पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी जलवाहिन्या नादुरुस्त असून, त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कोणताही भाग पाण्यावाचून वंचित राहणार नाही, याची महापालिकेने दक्षता घ्यावी.
संदेश जाधव, रहिवासी, मुंढवा
पाणीपुरवठ्याची वेळ बदलल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यातच पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने गैरसोय वाढली आहे. महापालिकेने कमी वेळ पाणी दिले तरी चालेल; पण नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा.
राहुल जगताप, रहिवासी, वडगाव शेरी
गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या भागात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका वाढला आहे. महापालिकेने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी.
सीमा शेडगे, रहिवासी, वडगाव शेरी

परिसरातील रामनगर भागात मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असतानाच कमी दाबामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. परिणामी, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही इतरत्र भटकंती करावी लागली. कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे, उत्तमनगर आणि कोंढवे-धावडे या भागांमध्ये सकाळी व दुपारी पाणीपुरवठा झाला. काही ठिकाणी पुरवठा सुरळीत असला, तरी रामनगर परिसरात पाण्याचा दाब अत्यल्प असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. रामनगर हा डोंगराळ व चढ-उताराचा परिसर असल्यामुळे अनेक भागांमध्ये आधीपासूनच पाणी कमी प्रमाणात मिळते. त्यातच मंगळवारी झालेल्या कमी दाबाच्या पुरवठ्यामुळे अनेक नळ कोरडेच राहिले. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेकडे पुरेशा दाबाने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. काही भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील बर्निंग घाट रस्ता, दरवडेमळा, कवडेवाडी, रेणुकावस्ती आदी भागांत मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सखल भागात सुरळीत पाणीपुरवठा झाला; मात्र उंच भागांतील रहिवाशांना पुरेसे पाणी मिळाले नाही. सोसायट्या आणि बंगलो परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. दरम्यान, काही वस्त्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरापर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याचे नागरिकांनी सांगितले. कोरेगाव पार्कमध्ये सोमवारी व मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा चालू होता, मात्र चढावरील भागात पाणी बंद होते

सिद्धार्थ चौक परिसरात उताराच्या भागाकडे पाणी वाहून जात असल्याने आमच्याकडे आधीच कमी पाणी येते. त्यातच मंगळवारी दाब अत्यंत कमी असल्याने पाण्यासाठी दुसरीकडे जावे लागले. पाणीकपात मान्य आहे; मात्र किमान पुरेशा दाबाने तरी पाणी सोडावे.
अश्विन ढगे, रहिवासी, वारजे
लक्ष्मी चौक, चव्हाण वाडा परिसरात चढ-उतार असल्यामुळे अनेक नळांना नियमितपणे कमी पाणी येते. मंगळवारी कमी दाबामुळे काही नळांना पाणी आलेच नाही. त्यामुळे दुसरीकडे जाऊन पाणी भरावे लागले. असेच सुरू राहिल्यास दोन दिवसांचा पाणीपुरवठा कसा भागवायचा, हा प्रश्न आहे.
बाळा चव्हाण, रहिवासी, वारजे
कवडेवाडी भागात सोमवारी रात्री एक वाजता पाणी आले. पाण्याचा दाब सुरुवातील कमी होता; मात्र आम्हाला पुरेसे पाणी मिळाले. काही भागातील नागरिकांना मात्र पुरेशे पाणी मिळाले नाही. नोकरी सांभाळून पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.
शैलजा लंबूगोल, रहिवासी, कोरेगाव पार्क
कोरेगाव पार्क परिसरातील काही भागात सोमवारी व मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. मात्र, उंच भागातील नागरिकांना पुरेशे पाणी मिळाले नाही.
सारिका बर्गे, रहिवासी, काेरेगाव पार्क

जून महिन्याच्या मध्यावर महापालिकेने पाणीकपात सुरू केल्याने कात्रज-आंबेगाव परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता दिवसाआड पाणी मिळत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. कात्रज, आंबेगाव, दत्तनगर, आगम मंदिर परिसर, भारती विद्यापीठ, शनिनगर, हनुमाननगर, भारतनगर, संतोषनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, गोकूळनगर आणि शिवशंभूनगर या भागांना उंच-सकल भौगोलिक रचनेमुळे नेहमीच कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना वर्षानुवर्षे पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या पाणीकपातीचा फटका कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील विविध सोसायट्यांना बसत आहे. नियोजित वेळेत पाणी न मिळणे आणि कमी दाबाने पुरवठा होणे, यामुळे रहिवाशांची गैरसोय वाढली आहे. पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नितीन खुडे म्हणाले की, दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना काही भागांत एअर लॉकची समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. सम-विषम तारखेनुसार भागनिहाय पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गरजे नुसार मागणी केल्यास टँकरची व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जात आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या पाणीकपातीचा परिणाम हडपसर परिसरात मिश्र स्वरूपात दिसून येत आहे. काही भागांत पुरेशे पाणी मिळत असले, तरी चढ असलेल्या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हडपसर परिसरातील मांजरी-केशवनगर-साडेसतरानळी प्रभाग (क्र. १५), हडपसर-सातववाडी प्रभाग (क्र. १६) आणि रामटेकडी-माळवाडी प्रभागात (क्र. १७) काही ठिकाणी पुरेशे पाणी मिळत आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत आहे. ससाणेनगर परिसरातील चढ असलेल्या भागात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र आहे. माळवाडी परिसरात कमी दाबाने पाणी येत आहे. परिणामी पाण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे. दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिक पाण्याची साठवणूक करण्यावर भर देत आहेत. मांजराईनगर येथील ७२ घरकुल परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नसल्याचे रहिवासी सुनीता ढेकणे यांनी सांगितले.

आमच्या भागात मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. महापालिकेने सुरू केलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सुजाता आतकरे, रहिवासी, कात्रज
पाणीकपातीमुळे एकच टँकर मिळाल्यामुळे घरगुती वापरासाठी देखील आमच्या सोसायटीला पाणी अपुरे पडत आहे. प्रशासनाने नागरिकांना पुरसे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
रामचंद्र खंदारे, रहिवासी, कात्रज
महापालिकेकडून आता दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने गृहिणींचे घरातील कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. प्रशाननाने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
दीपाली थेऊरकर, रहिवासी, हडपसर
घरातील कामे उरकून वेळेवर नोकरीच्या ठिकाणी जावे लागते. मात्र, पाणीकपातीमुळे दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून, त्याचा आर्थिक फटकाही बसत आहे.
गीतांजली काळे, रहिवासी, हडपसर

महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे बिबवेवाडी परिसरातील काही भागांतील रहिवाशांना पुरेशे पाणी मिळत नाही. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन बिघडले आहे. बिबवेवाडीतील शिवतेजनगर, विघ्नहरनगर, खडकेवस्ती, पीएमटी कॉलनी, सरगम चाळ, श्रेयसनगर आणि प्रसाद बिबवेनगर या भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यातच परिसरात सायंकाळी पाचनंतर पाणी सोडले जात असल्याने कामगार व कष्टकरी वर्गाला पाणी साठवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेकांना कामावरून लवकर घरी यावे लागत आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे पाणी साठवणुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. पुरेशी भांडी नसल्याने अनेक कुटुंबांना आवश्यक तेवढे पाणी साठवणे शक्य होत नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.

महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश पेठांच्या परिसरात मंगळवारी सम तारखेला पाणीपुरवठा झाला. अनेक ठिकाणी कमी दाबाने, तर काही भागांत उशिरा पाणीपुरवठा झाल्याने पाणी भरण्यासाठी नागरिकांची दमछाक झाल्याचे चित्र दिसून आले. कसबा पेठेतील मुजुमदार बोळ परिसरातील वाड्यांमध्ये सकाळच्या वेळेत पाणी न आल्याने नागरिकांना दुपारपर्यंत पाण्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर पाणी आले ते देखील कमी दाबने आल्याने नागरिकांची पाणी भरण्यासाठी धावपळ झाली. शनिवार पेठ, नारायण पेठ आणि मंगळवार पेठ या भागांमध्ये पाणी नेहमीच्या वेळेत आले. मात्र, या भागात देखील पाण्याचा दाब कमी असल्याचे रहिवाशांनी सांगितले. चौकांतील सार्वजनिक नळांवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांकडून पाणी साठविण्यावर भर दिला जात आहे.

आमच्या भागात सायंकाळी सहा किंवा सात वाजता पाणी येत आहे. पाणी साठवण्यासाठी पुरेशी भांडी नसल्यामुळे आम्हाला पाण्याचा पुरेसा साठा करता येत नाही. पाण्यासाठी कामावरून लवकर घरी यावे लागते. इतर कामे बाजूला ठेवून पाणी भरण्याचे काम करावे लागत आहे.
मीरा शिंदे, रहिवासी, शिवतेजनगर
पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडलेले आहे. ज्या दिवशी क्लोजर असतो, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही अनेकदा पाणी मिळत नाही. पाण्यासाठी कामाच्या वेळांमध्ये बदल करावा लागत आहे.
मीनाबाई साबळे, रहिवासी, विघ्नहरनगर
सकाळी पाणी आले नव्हते. मात्र, सकाळी ११ नंतर कमी दाबाने पाणी येण्यास सुरुवात झाली. दुपार पर्यंत पुरवठा सुरू असल्याने आम्हाला पुरेशे पाणी मिळाले
महेश मोळावडे, रहिवासी, कसबा पेठ
महापालिकेने सम-विषम तारखांना किमान चार तास पाणीपुरवठा करावा. त्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध येईल.
अनिल अगावणे, रहिवासी, नारायण पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT