Pune Water shortage
पुणे : शहराला पाणी पुरविणाऱ्या धरणांत पाणीसाठा मुबलक असताना देखील यंदा पुणेकरांच्या टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. महापालिकेने या वर्षी पुणेकरांना तब्बल ४७ हजार ८३६ टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले. गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत या वर्षी टँकर फेऱ्यांत ६ हजार २३३ ने, तर २०२३ च्या तुलनेत १४ हजार १९३ फेऱ्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका सर्वाधिक असताना देखील टँकर फेऱ्यांची संख्या ६० ने घटली आहे.
पुण्यात या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा चांगलाच कडाका वाढला आहे. तापमान जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. यामुळे पाण्याची देखील मागणी वाढली. ही वाढलेली पाण्याची मागणी पूर्ण करताना पालिकेच्या नाकी नऊ आलेले. ही वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा वाढविण्यात आला. या वर्षी एप्रिल महिन्यात महापालिकेतर्फे टँकरच्या ४७ हजार ८३६ फेऱ्या झाल्या. गेल्या गतवर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत टँकर फेऱ्यांमध्ये ६ हजार २३३ ने वाढ झाली, तर २०२३ च्या तुलनेत तब्बल १४ हजारांनी वाढ झाली. २०२३-२४ च्या एप्रिल महिन्यात टँकरच्या एकूण ३३ हजार ६४३ फेऱ्या झाल्या होत्या, तर २०२४-२५ मध्ये टँकरच्या ४१ हजार ६०३ फेऱ्या झाल्या. २०२५-२६ मध्ये महापालिकेकडे ४७ हजार ८३६ टँकर फेऱ्यांची नोंद झाली आहे.
पुण्यात बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा वाहिन्यांचे जाळे पोहचले नाही. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभागाला मर्यादा येतात. त्यामुळे पालिकेमार्फत अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडे टँकर कमी असल्याने पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदारांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. ८ टँकर असलेल्या ठेकेदारांमार्फत हे पाणी पुरविले जाते. यासाठी शहरात टँकर भरणा केंद्र देखील आहेत. हे पाणी पुरविण्यासाठी पालिका ठेकेदारांना पैसे देते. ज्या सोसायट्यांना पाणी कमी पडते किंवा त्यांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे अशा सोसायट्यांना ठरलेले शुल्क भरून टँकर दिले जातात. या सर्व टँकर फेऱ्यांची नोंद पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ठेवली जाते. या वर्षीच्या नोंदीत गत वर्षीच्या तुलनेत ६ हजार २३३ फेऱ्यांची वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
खासगी टँकरचालक आपला पाणीसाठा वापरून पाणीपुरवठा करतात. याची नोंद पालिकेने ठेवणे गरजेचे असताना ती ठेवली जात नाही. हे टँकर बरेचदा वापरायच्या पाण्यासाठी मागविले जातात. मात्र, त्यांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने टँकरचालकांकडून मोठी रक्कम आकारून नागरिकांची लूट केली जाते. याबाबत अनेक तक्रारी करून देखील अशा टँकरमाफियांवर कारवाई केली जात नाही.
मार्च २०२५ च्या तुलनेत एप्रिल महिन्यात शहरात जास्त ऊन होते. उन्हाचा पारा चाळिशी पार गेला होता. मात्र, असे असताना देखील महापालिकेने पुरविलेल्या टँकरसंख्येत थोडी घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टँकरने ही घट झाली आहे. महापालिकेने मार्च महिन्यात ४७ हजार ८९६ टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले होते. त्या तुलनेत एप्रिल महिन्यात उकाडा अधिक असूनही टँकर फेऱ्यांची संख्या काहीशी घटली आहे. एप्रिल २०२५ मध्ये ४७ हजार ८३६ टँकर फेऱ्यांची नोंद झाली आहे.
एप्रिल २०२३ - ३३,६४३
एप्रिल २०२४ - ४१,६०३
एप्रिल २०२५ - ४७,८३६
मार्च २०२५- ४७,८९६