पुणे: शहरातील पाणी साचणाऱ्या ३९ ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना, आपत्कालीन नियोजन आणि कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांची स्पष्ट जबाबदारी निश्चित करावी तसेच या कामांचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश स्थायी समितीने बुधवारी महापालिका प्रशासनाला दिले.
शहरातील ३९ वॉटर लॉगिंग स्पॉट्सपैकी अनेक ठिकाणी अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झालेल्या नाहीत. मान्सूनपूर्वी वाहतूक पोलिसांनी संबंधित विभागांना सूचना करूनही अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी निदर्शनास आणून दिले.
रस्ते खचणे, खड्ड्यांचे प्रमाण वाढणे आणि विविध विकासकामे अपूर्ण राहिल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय नसल्यामुळे दीर्घकालीन उपाययोजनांऐवजी तात्पुरत्या उपायांवरच भर दिला जात असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.
या पार्श्वभूमीवर शहरातील ३९ वॉटर लॉगिंग स्पॉट्सपैकी किती ठिकाणी कायमस्वरूपी कामे पूर्ण झाली, उर्वरित कामांची सद्यस्थिती काय आहे, ती कोणत्या टप्प्यात आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी निश्चित कालमर्यादा काय आहे, याबाबतचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, असे निर्देश भिमाले यांनी दिले.
याशिवाय, स्मार्ट सेन्सर, पंपिंग स्टेशन आणि रिअल-टाईम मॉनिटरिंग प्रणाली सध्या किती ठिकाणी कार्यरत आहे, याचाही आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसापूर्वी आणि पावसानंतर पाणी साचल्यास तातडीने उपसा करण्यासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन पथके प्रत्येक संवेदनशील ठिकाणी सज्ज ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.