Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Cut: पुणेकरांवर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट? आज महापौरांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

धरणांतील साठा घटला; १५ टक्के पाणीकपातीच्या सूचनेनंतर महापालिकेचा प्रस्ताव चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावावर सोमवारी (दि. ८ जून) निर्णय होणार आहे. यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी बैठक बोलावली आहे.

अल-निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे चालू वर्षात सरासरी ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरवर्षीपेक्षा पावसाचे हे प्रमाण खूपच कमी असणार आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने दि. ३१ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध होईल व पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, यासाठी दरमहा १५ टक्के पाणीकपात करण्याबाबत महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दिवसाआड पाणीकपात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे पाणी वापरात २५ टक्के कपात होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

दरम्यान, ही पाणीकपात लागू करायची की नाही आणि लागू करायची झाल्यास ती कधीपासून करायची, यासंबंधीचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होणार आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांनी सोमवारी पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक बोलावली असून, त्यात या पाणीकपातीवर निर्णय होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

खडकवासला धरण साखळीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा शिल्लक आहे. शेती व पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने टेमघर पाठोपाठ वरसगाव धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे.

रविवारी (दि. ७ जून) सायंकाळी ५ वाजता खडकवासला धरण साखळीत ५.१६ टीएमसी म्हणजे १७.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गेल्यावर्षी ७ जून रोजी धरण साखळीत ५.४८ टीएमसी म्हणजे १८.८० टक्के पाणीसाठा होता. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत वरसगाव धरण खोऱ्यात दरवर्षी ७ जूनला मान्सूनच्या पावसाचा शिडकावा होतो, मात्र सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरू आहे.

खडकवासला धरण विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर-फुटाणे म्हणाल्या, खडकवासला धरणातून शेतीला सुरू असलेला पाणीपुरवठा ११ किंवा १२ जून रोजी बंद करण्यात येणार आहे.

१२ जूनपर्यंत शेतीला पाणीपुरवठा सुरू राहिल्यास धरणसाठ्यात जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची घट होणार आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत धरण साखळीत अवघा साडेचार टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT