Water Crisis Pudhari
पुणे

Pune Water Crisis: पुण्यात पाणी संकटाचा उद्रेक

खडकवासला धरणसाखळीतील साठा घटल्याने शहरात टंचाई; भीमनगर व मांजरीत नागरिकांचे आंदोलन, प्रशासनाची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: पावसाळा सुरू होऊनही अद्याप पुणे जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले नसल्याने खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठ्यात दर तासागणिक घट सुरू आहे. धरणसाखळीत शुक्रवारी केवळ ४.०५ टीएमसी म्हणजे १३.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह सर्व धरण क्षेत्रात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे या साखळीतील साठा झपाट्याने कमी होत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणसाखळीत जवळपास निम्म्याने पाणी कमी आहे. धरणसाखळीत १९ जून २०२५ रोजी ७.४० टीएमसी म्हणजे २५.३९ टक्के साठा शिल्लक होता. धरणसाखळीत अल्पप्रमाणात पाणी असल्याने पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा धरणसाखळीत मान्सूनपूर्व पाऊसही पडला नाही. पाण्याची पातळी खाली गेल्याने खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणांचे बहुतांश पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. धरणक्षेत्रात गाळ मातीचे तांडे, डबकी दिसत आहेत. जून महिना अर्धा संपला तरी पावसाने दडी मारल्याने पुणे शहर व जिल्ह्यांतील एक कोटी नागरिकांसह हजारो हेक्टर शेतीची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अद्यापही पाण्याची भर पडली नसल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे. धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने शहरात पाणीकपात सुरू करण्यात आल्याने नागरिकांचे मोठी गैरसोय होत आहे.

जूनमध्ये प्रथमच अल्पसाठा

खडकवासला धरणसाखळीत जून महिन्याच्या अखेरीस यंदा प्रथमच अल्प पाणीसाठा आहे. टेमघर धरण अडीच महिन्यांपूर्वीच कोरडे पडले. वरसगावमध्ये सध्या १.५० टीएमसी म्हणजे ११.६७ टक्के, तर पानशेतमध्ये १.८९ टीएमसी म्हणजे १७.७७ टक्के पाणी आहे. या दोन धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यावर खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. खडकवासला धरणात ०.६७ टीएमसी म्हणजे ३३.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

घोरपडी येथील भीमनगर परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याने महिलांनी पाण्याचे हंडे घेऊन भीमनगर येथील मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सात ते नऊ या वेळीत रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेकडून सम-विषम तारखांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यानुसार येथे पुरेसे पाणी मिळण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेने मागील चार-पाच दिवसांपासून सम-विषम तारखांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. भीमनगर येथे मागील काही वर्षांपासून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच महापालिकेने सम-विषम तारखांना पाणीपुरवठा सुरू केल्याने या ठिकाणी जे पाणी येत होते, ते देखील आता येत नसल्याने येथील महिलांचा संताप अनावर झाला. पाण्यासाठी नागरिकांची ओरड झाल्यावर भीमनगर येथे महापालिकेकडून पाण्याचा टँकर पाठविला जात असून, तोही अर्धाच असतो. आम्हाला कामाला जायचे असते. मात्र, टँकरची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेमहिलांनी सांगितले.

परिसरातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभागाचे चारही नगरसेवक आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी येत नाही, तोपर्यंत रास्ता रोको सुरूच ठेणार असल्याची भूमिका या वेळी महिलांनी घेतली. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

मांजरी बुद्रुक परिसरात जलवाहिनी फुटल्याने सुमारे २५ हजार नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात प्रशासनाकडून विलंब झाल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी पालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन केले.

गेल्या पाच दिवसांपूर्वी रेल्वे गेटजवळील चारीच्या ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने मांजरी बुद्रुक गावठाण, मांजराईनगर झोपडपट्टी, माळवाडी, कुंजीरवस्ती, वेताळवस्ती, राजीव गांधीनगर, सटवाईनगर आदी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. जलवाहिनी फुटल्याची माहिती प्रशासनाने नागरिकांना वेळेत दिली नसल्याचा आरोप करीत अखिल मांजराईनगर कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

जलवाहिनी नेमकी फुटली की जाणीवपूर्वक फोडण्यात आली, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यास होत प्रशासनाकडून विलंब झाल्याने नागरिकांनी हे अर्धनग्न आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. निवेदन देताना राजेंद्र साळवे, किशोर देशमुख, उल्का चव्हाण, सुनीता ढेकणे, मल्लिका सोनवणे, सावित्रा सावंत, कविता जाधव आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

पुणे शहर व परिसरासाठी खडकवासला धरणातून बंदिस्त जलवाहिनीत ६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. या शिवाय वारजे, कोंढवे धावडे व इतर पाणीपुरवठा केंद्राना पाणी सोडले जात आहे. धरण क्षेत्रातील २५ गावांना पिण्यासाठी खडकवासला धरणातून पाणी दिले जात आहे. सध्या शेतीचा पाणीपुरवठा बंद आहे.
गिरिजा कल्याणकर-फुटाणे, शाखा अभियंता, खडकवासला धरण विभाग
भीमनगर येथे ज्या ठिकाणी पाणी येत नाही, त्या ठिकाणी जलवाहिनीमध्ये बिघाड झाला का? याची तपासणी केली जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करून परिसरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दत्तात्रय टकले, उपअभियंता, लष्कर पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT