पुणे: दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. पाणीटंचाईमुळे वाढलेल्या नागरिकांच्या संतापाचे प्रतिबिंब सभागृहात उमटले. टँकर व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या, पूर्वसूचना न देता बंद होणारा पाणीपुरवठा आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
या चर्चेदरम्यान महापालिका प्रशासन पाणीगळती आणि पाण्याची नासाडी रोखण्यात कमी पडल्याची स्पष्ट कबुली आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. नगरसेवक सुनील शिंदे यांनी शहरात टँकरचा मोठ्या प्रमाणावर कथित काळाबाजार सुरू असल्याचा आरोप केला. नगरसेवक पुनीत जोशी यांनी एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय योग्य असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी पोहोचत नसल्याचे निदर्शनास आणले.
नगरसेविका वैशाली बनकर यांनी अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. पाण्याच्या टाक्यांची रखडलेली कामेही नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरसेवक उदय लेले यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित केली. कोंढवा-कौसरबाग परिसरातील गंभीर पाणीटंचाईकडे लक्ष वेधत नगरसेवक गफूर पठाण यांनी त्या भागात टँकरच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली. नागरिकांच्या संतापाचा सामना लोकप्रतिनिधींनाच करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका मिताली सावळेकर यांनी विविध विकासकामांदरम्यान आवश्यक परवानग्या न घेता उत्खनन केल्यामुळे वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. काम सुरू करण्यापूर्वी पाणीपुरवठा बंद करण्याच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक हरिदास चरवड यांनी टँकर वितरणासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी केली. स्वप्नील दुधाने यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला जात असल्याचा आरोप करत, निसर्गावर दोष ढकलून प्रशासन स्वतःची जबाबदारी टाळत असल्याची टीका केली.
यावर उत्तर देताना पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी, पाणीपुरवठा सुरू होताच सर्व भागांत एकाच वेळी मागणी वाढत असल्यामुळे सुरुवातीला कमी दाबाची समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले. गेल्या आठवड्यातील तक्रारींनंतर रास्ता पेठ, नाना पेठ, डेक्कन आणि सातारा रस्ता परिसरातील समस्या दूर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. टँकरची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, या खुलाशावर नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आक्षेप घेत, दुष्काळाची शक्यता आधीपासून माहीत असतानाही उन्हाळ्यात सलग चार महिने शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. या अपयशासाठी राज्य सरकार जबाबदार की महापालिका, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी वीजपुरवठ्याचे नियोजन बदलल्यास पाणीपुरवठा अधिक प्रभावी होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. नगरसेवक गणेश बिडकर यांनी पाणी न पोहोचणाऱ्या भागांचा स्वतंत्र आराखडा तयार करून लहान टँकर सुरू करण्याची सूचना केली.
आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करीत राज्य शासन आणि जलसंपदा विभागाशी सातत्याने समन्वय सुरू असल्याचे सांगितले. पुण्याच्या सुमारे ७६ लाख लोकसंख्येचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पाणीगळती आणि पाण्याची नासाडी रोखण्यात महापालिका कमी पडत आहे, हे मी मान्य करतो,'' असे त्यांनी स्पष्ट केले. पाणीकपातीची आवश्यकता लक्षात आल्यानंतर महापौरांशी चर्चा करून जूनपासून एकदिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी लोकप्रतिनिधींचे फोन अनेक कनिष्ठ अभियंते बंद ठेवत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, तसेच लोकप्रतिनिधींना तातडीने प्रतिसाद देण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाने द्याव्यात, असे निर्देश दिले.
एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय फसला
पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा याचा निर्णय फसला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी केला. या निर्णयामुळे नागरिकांना त्रास होत आहे. अनेक भागांत पाणी मिळत नाही. लाइन फुटत आहे. पाण्याची वेळ कमी आहे. समाविष्ट भागांत हा प्रश्न गंभीर आहे. हा प्रयोग बंद करून आठवड्यातून दोन दिवस पाणी बंद हा प्रयोग करून पाहिला, तर लोकांना किमान पाणी मिळेल, अशी मागणी निकम यांनी केली.