Pune River Waste Pudhari
पुणे

Pune River Waste Dumping Issue: मुळा-मुठा नदीत कचरा टाकण्याचा संतापजनक प्रकार; अष्टापूरमध्ये नागरिकांचा संताप उसळला

हवेली तालुक्यातील नदीपात्र कचरा डेपो बनले; दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका, ठेकेदारांवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

लोणी काळभोर: पुणे शहरातील ओला आणि सुका कचरा थेट हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील नदीपात्रात फेकला जात असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तीव संतापाची लाट उसळली आहे. संबंधित ठेकेदारांनी अक्षरशः नदीला कचरा डेपो बनवले असून, प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

येथे दररोज अनेक वाहनांतून दिवसरात्र कचरा नदीत टाकला जातो. यामुळे पाण्याचा रंग, वास आणि गुणवत्ता पूर्णपणे बिघडली आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक नागरिक आणि जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अनेक ठिकाणी जनावरांना आजार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

या भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना मुळा-मुठा नदीवर अवलंबून असल्याने परिस्थिती अधिकच भीषण बनली आहे. हजारो नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे. यामुळे भविष्यात मोठ्या आरोग्य संकटाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा धक्कादायक प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासन, संबंधित महापालिका यंत्रणा आणि अधिकारी काणाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवाद यांनी तातडीने या गंभीर प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, नागरिक रस्त्यावर उतरून तीव आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा न राहता मानवी जीवितहानीचा ठरणार आहे.

त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. या प्रकाराबाबत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने आणि लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी ग््रााम महसूल अधिकारी व मंडलाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदाराची व त्याला मदत करणाऱ्या स्थानिकांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT