प्रभागरचनेवर संतापाचा भडका pudhari
पुणे

Pune: प्रभागरचनेवर संतापाचा भडका; दोन दिवसांत 168 हरकती

नदी, रेल्वे, महामार्ग ‘डावलून’ विभाजन केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर होताच शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांसह राजकीय व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली असून, याविरोधात महापालिकेकडे आत्तापर्यंत तब्बल 168 हरकती दाखल झाल्या आहेत. नैसर्गिक आणि भौगोलिक सीमांचा विचार करून प्रभागरचना करणे बंधनकारक असतांना सत्ताधार्‍यांनी मनाला येईल तशी प्रभागरचना केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Pune Latest News)

पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रतीक्षेत असलेली प्रभागरचना अखेर जाहीर झाली आहे. तीन वर्षे रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते शुक्रवारी प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागसंख्या एकने कमी होऊन 41 झाली आहे, तर सदस्यसंख्या एकने वाढून 164 वरून 165 वर पोहचली आहे. मात्र, या प्रभागरचनेवरून विरोधक, महायुतीतील पक्षांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

प्रभागरचनेविरोधात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होऊ लागल्या असून, निवडणूक कार्यालय, स्वागत कक्ष आणि 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकूण 168 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना व राजकीय पक्षांना या प्रभागरचेनवर त्यांच्या हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे.

खराडीतील थिटेवस्ती, क्रांती पार्क, रोघोबा पाटीलनगरचा काही भाग तोडून तो मांजरी बु., साडेसतरा नळी या प्रभागात जोडण्यात आला आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा या प्रभागातील काही भाग प्रभाग क्रमांक 13 मध्ये समाविष्ट केला आहे. यामध्ये वाडिया कॉलेज परिसर, बंडगार्डन रस्ता, बोट क्लब, ताडीवाला बस्ती, ल मेरिडियन हॉटेल, आरटीओ, रास्ता पेठ आणि पुणे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे

मुंढवा, पिंगळेवस्ती, शिर्के रोड, बी. टी. कवडे रोडसह कोरेगाव पार्क प्रभाग 14 मध्ये ठेवण्यात आला असून, या भागाला ‘मुंढवा-घोरपडी’ असे नाव देण्यात आले आहे. या विभागणीमुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.

महानगरपालिकेकडे आलेल्या तक्रारी

  • धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय - 1

  • ढोले पाटील रोड - 8 हडपसर-मुंडवा -1

  • कसबा विश्राम बागवाडा -1

  • कोथरूड-बावधन - 2 वारजे कर्वेनगर - 1 येरवडा-कळस -धानोरी - 1 निवडणूक कार्यालये -158 एकूण - 168

लोकसंख्येच्या प्रमाणात आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच महानगरपालिकेची प्रभागरचना करण्यात आली आहे. न्यायालयात जाण्यापूर्वी नागरिकांना आपली हरकत व सूचना मांडण्याची संधी आहे. नागरिकांनी या संधीचा वापर करावा, त्यांचा विचार नक्की केला जाईल. प्रभागरचना करताना सर्वांचे समाधान होईल असे होणे शक्य नसते.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT