पुणे: वाघोली परिसरातील एका लॉजवर धाड टाकून गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने वेश्याव्यवसाय चालवणार्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करून दोन दलालांना अटक केली आहे. आफताब इद्रीस अहमद (वय २१, रा. खराडी) आणि गणेश सुनील हांडगर (वय २३, रा. बावडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार तुषार भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील उबाळेनगर येथील 'आतिथी लॉज'मध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी आणले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.३०) रात्री सापळा रचून छापा टाकण्यात आला. आरोपींनी तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले.
तसेच या व्यवसायातून मिळणार्या कमाईतील ठराविक हिस्सा स्वतः घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी १५०० रुपये रोख रक्कम आणि १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, दोघांना अटक केली आहे. वाघोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.