Pune Wagholi laptop thief
पुणे : वाघोली परिसरातून लॅपटॉप चोरणाऱ्या तामिळनाडूच्या चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांना पाहून तो पळ काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पळताना ठेच लागून तो जमिनीवर पडला आणि अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अटक करण्यात आलेल्या सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, तामिळनाडू) या चोरट्याकडून दोन लाख रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
नागराज याने १२ ऑगस्ट रोजी पहाटे वाघोली येथील एका सोसायटीतील वसतिगृहातून पाच लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलिस गस्तीदरम्यान चिंतामणी पार्कजवळ तो संशयास्पद हालचाली करताना दिसला. पोलिसांनी जवळ जाताच त्याने पळ काढला. मात्र पळताना पडल्याने त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले.
या कारवाईत परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्मिता पाटील यांच्यासह सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस कर्मचारी सातपुते, वणवे, भोसले, अण्णा माने, जगदाळे, देवीकर, शिरगिरे, कुदळे, वीर, पाटील, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, दडस, थोरात यांनी ही कामगिरी केली.