पुणे: विश्रांतवाडी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा खून केल्यानंतर आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील वसाहतीत घडली. आरोपींनी नागरिकांना धमकावून घराच्या दरवाज्याची तोडफोड केली. विश्रांतवाडी भागात 15 एप्रिल रोजी मध्यरात्री शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील वसाहतीतील गौरव तेलंगी याच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घडली होती.
या प्रकरणात पोलिसांनी तौफिक शेख, राजन दोरास्वामी (दोघे रा. शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळील वसाहत) यांच्यासह साथीदारांना अटक केली होती. तेलंगी याचा खून केल्यानंतर मध्यरात्री पसार झालेले आरोपी तौफिक, राजन आणि साथीदार शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील वसाहतीत शिरले. त्यांच्याकडे कोयते होते. कोयते उगारून आरोपींनी दहशत माजविली. ‘प्रतिस्पर्धी टोळीतील सराईतांना साथ देऊ नका.
तौफिक-राजन टोळीच्या विरोधात गेल्यास जिवे मारू’, अशी धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी वसाहतीतील घरांच्या दरवाज्यावर कोयते आपटून दहशत माजविली. नागरिकांना शिवीगाळ करून पसार झाले. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, तौफिक शेख, राजन दौरास्वामी यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.