Pune Vidhan Parishad Seat: विधान परिषद निवडणुकीची चाहूल लागताच महायुतीतल्या जागावाटपावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. विशेषतः पुण्याच्या जागेवरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील स्वतःचे वाढते संख्याबळ आणि स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा याच्या जोरावर भाजपने आता पुण्याच्या जागेवर दावा सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी अलीकडेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पुण्याची जागा भाजपलाच देण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी केवळ राजकीय दावेदारी न सांगता, आकडेवारी पुढे करत भाजपची ताकद अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात भाजपकडे असलेल्या सदस्यसंख्येचा दाखला देत पुण्यात भाजप सर्वात मजबूत पक्ष असल्याचा दावा पक्षातील स्थानिक नेते करत आहेत.
राजकीय गणित मांडताना भाजपने जिल्ह्यातील काही प्रभावी स्थानिक आघाड्यांनाही आपल्यासोबत धरले आहे. भाजपकडे जिल्ह्यात ३०९ सदस्य असल्याचे सांगितले जात असताना, इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’ आणि दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’ यांचा पाठिंबाही मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या स्थानिक आघाड्यांची मते धरून भाजपची ताकद तब्बल ३३३ मतांपर्यंत पोहोचत असल्याचे पक्षाकडून मांडले जात आहे. हाच ‘३३३’चा आकडा आता भाजपच्या दाव्याचा मुख्य आधार बनला आहे.
भाजपचे म्हणणे असे की, पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे विधान परिषदेची जागा मित्रपक्षाला देण्यापेक्षा भाजपनेच ती लढवली पाहिजे. अन्यथा स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते, अशी भावना काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, पुणे जिल्हा हा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो. विशेषतः अजित पवार यांचा पुणे जिल्ह्यात मजबूत प्रभाव मानला जातो. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. भाजपच्या मते, सध्या अजित पवार गटाकडे जवळपास २९८ सदस्य आहेत. तुलनेत भाजपची ताकद अधिक असल्याचा दावा पक्षाकडून सातत्याने पुढे केला जात आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीची नैसर्गिक दावेदारी राहिली नसल्याचा युक्तिवाद भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.
या संपूर्ण राजकीय समीकरणात पुणे महापालिकेतील आकडे विशेष महत्त्वाचे ठरत आहेत. महापालिकेतील १६५ सदस्यांपैकी ११९ सदस्य भाजपचे असल्याचे सांगितले जात आहे. तर अजित पवार गटाकडे तुलनेने कमी सदस्यसंख्या असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. शहरातील या वर्चस्वाच्या आधारे पुण्यातील जागा भाजपच्या खात्यात यावी, यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, गणेश बीडकर स्वतः या जागेसाठी इच्छुक असल्याचीही चर्चा रंगत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांनी मोर्चेबांधणी केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही पुण्याची जागा पक्षालाच मिळावी, अशी मागणी होताना दिसत आहे.
मात्र, महायुतीत जागावाटपाचा अंतिम निर्णय हा केवळ स्थानिक आकडेवारीवर होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेतृत्व या जागेचा तिढा कसा सोडवतात, याकडे आता पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.