Green Peas Pudhari
पुणे

Pune Vegetable Market: पुणे बाजारात मटारचे दर वाढले; आवक घटली

गुलटेकडी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक स्थिर; इतर भाज्यांचे दर मात्र कायम

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. 29) राज्यासह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर राहिली. मात्र, परराज्यांतून येणाऱ्या मटारची आवक पूर्णपणे बंद झाल्याने खरेदीदारांनी आपला मोर्चा पारनेर मटारकडे वळविला.

बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी वाढल्यामुळे मटारच्या दरात सुमारे पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाली. याउलट इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर राहिल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.

परराज्यांतून झालेल्या आवकेत कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 5 ते 6 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे 5 ते 6 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 4 ते 5 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी 4 ते 5 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 3 टेम्पो, आंध्र, कर्नाटक तामिळनाडूतून तोतापुरी कैरी 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो; तर इंदूर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेत सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेट, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गजर 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 ते 3 टेम्पो, पारनेर मटार 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 ते टेम्पो, कांदा सुमारे 100 ते 125 टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पालेभाज्यांचे भाव स्थिर

मागणी आणि पुरवठा, यातील समतोलामुळे पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गॅस तुटवड्यामुळे फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांना अपेक्षित उठाव नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केत यार्ड येथील घाऊक बाजारात रविवारी (दि. 29) जिल्ह्यासह पुणे विभागात सव्वा लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मेथीची 70 हजार जुडी आवक झाली. ही आवक 10 हजार जुडीने वाढली आहे. कोथिंबिरीला घाऊक बाजारात 8 ते 12 रुपये भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT