भरपावसात 15 तासांत 20 गावांचा वीजपुरवठा सुरळीत Pudhari
पुणे

Uruli Kanchan power restoration: भरपावसात 15 तासांत 20 गावांचा वीजपुरवठा सुरळीत

महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागातील कर्मचार्‍यांची पराकाष्ठा, पावसामुळे 26 खांब, 5 रोहित्र जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

उरुळी कांचन : पूर्व हवेलीत पावसाने हाहाकार उडविल्याने वीस गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत 15 तासांत उरुळी कांचनसह लोणी काळभोर, थेऊर, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी आदी 20 गावांचा वीजपुरवठा सुरळीत केला.

पूर्व हवेलीला वादळी वार्‍यासह परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला. थेऊर, सोरतापवाडी, रायवडी, रामदरा, पाटील वस्ती, सिदराम मळा व बाजारमळा परिसरात 7 हून अधिक खांब पडले. (latest Pune News)

झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या. सोमवारी (दि. 15) सकाळपासून या ठिकाणची दुरुस्तीची कामे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी सुरू केली. झाडे हटविण्याचे व पोल उभारण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा सुरळीत झाला.

लोणी काळभोर महावितरण शाखेचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, वरिष्ठ तंत्रज्ञ बाळासाहेब सायकर, लाईनमन पी. एस. खरमाटे, वरिष्ठ तंत्रज्ञ मुस्तफा शेख, अमोल शेलार, अक्षय पाटील, तंत्रज्ञ अजय डोंगरे, सिराज सय्यद, अबू सय्यद, दादा चौधरी, योगेश गिरी, पांडुरंग खरात व रोहित काळभोर यांनी भरपावसात काम करत वीजपुरवठा पूर्ववत केला.

थेऊर-कोलवडी परिसरात दोन रोहित्र पडले. परिसरात 5 खांब पडले होते. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला. कुंजीरवाडीत दोन खांब पडले होते.

अष्टापूर, कोरेगाव मूळ, हिंगणगाव, भवरापूर, खामगाव टेक, शिंदेवाडी या गावांचादेखील वीजपुरवठा खंडित झाला होता. या ठिकाणी विद्युतपुरवठा करणारे 23 केव्हीचे एकूण 10 खांब पडले होते. महावितरणचे कर्मचारी गणेश धुमाळ, स्वप्निल गायकवाड, बालाजी मुरकुटे व पप्पू कोतवाल यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम करून विद्युतपुरवठा सुरू केला.

मुसळधार पावसाचा अंदाज आल्याने उरुळी कांचन महावितरणने ओढे, नाले व शेतीसाठी जाणारा विद्युतपुरवठा अगोदरच बंद केला होता. महावितरणचे सहाय्यक अभियंता तुषार होनमाने, निलकंठ शिंदे, विक्रम बोरगल, जगदीश कानतोडे, अनिल महाजन या सर्व कर्मचार्‍यांनी मेहनत घेऊन वीस ठिकाणी पडलेल्या तारा पुन्हा जोडत विद्युतपुरवठा सुरू केला.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पडझडीत महावितरणाचे 30 लाखांचे नुकसान झाले. उपविभागातील सर्वच कर्मचार्‍यांनी कार्यतत्परता दाखविल्याने विद्युतपुरवठा लवकर सुरू झाला आहे, त्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांचे अभिनंदन करतो. सुदैवाने पावसात कुठलीही दुर्घटना घडली नाही.
-महेश धाडवे, उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT