पुणे: आउटलुक आयकेअर रँकिंग 2025 मध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठ प्रवर्गामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यात पश्चिम बंगाल येथील जाधवपूर विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर असून, कोलकाता विद्यापीठ दुसर्या क्रमांकावर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 1 हजारपैकी 928.43 गुण मिळाले असून, कोलकाता विद्यापीठाला 928.49 गुण मिळाले आहेत, तर पहिल्या क्रमांकावरील जाधवपूर विद्यापीठाने 929.7 गुण मिळविले आहेत.
अॅकॅडमी रिसर्च अँड एक्सलन्समध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 400 पैकी 386.98 गुण, इंडस्ट्री इंटरफेस अँड प्लेसमेंटमध्ये 200 पैकी 192.2 गुण, तर इन्फ्रास्ट्रक्चर अँड फॅसिलिटीमध्ये 150 पैकी 136.43 गुण मिळाले आहेत. (Latest Pune News)
आउटलुकतर्फे नुकतीच देशभरातील 75 टॉप सार्वजनिक राज्य विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 3 क्रमांकावर असून, मुंबई विद्यापीठ 26 व्या क्रमांकावर, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 28 व्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ
40 व्या क्रमांकावर असून, उत्तर
महाराष्ट्र विद्यापीठ 46 व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ 52 व्या क्रमांकावर असून, गोंडवाना विद्यापीठ 75 व्या क्रमांकावर आहे.
रँकिंगमध्ये तिसर्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट राज्य सार्वजनिक विद्यापीठ म्हणून गौरव होणे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. हे यश आमच्या प्राध्यापक, होतकरू विद्यार्थी आणि समर्पित कर्मचार्यांच्या एकत्रित कठोर परिश्रमाचे द्योतक आहे. आम्ही शिक्षण आणि संशोधनाचे दीपस्तंभ म्हणून विद्यापीठाचा वारसा पुढे नेत, यापुढेही यशाची नवी शिखरे गाठण्याचा प्रयत्न करीत राहू.- डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तिसर्या क्रमांकाचे रँकिंग हे उल्लेखनीय आहे. शैक्षणिक आणि संशोधनातील उत्कृष्टतेचा आमचा अथक प्रयत्न आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार्या आमच्या प्राध्यापकांच्या समर्पणाचे, संशोधकांच्या नावीन्यपूर्ण वृत्तीचे आणि एसपीपीयू परिवारातील प्रत्येक सदस्याच्या कठोर परिश्रमाचे हे स्पष्ट प्रतिबिंब आहे. शैक्षणिक कार्यक्रम सतत प्रगत करीत, औद्योगिक भागीदारी मजबूत करीत आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण वातावरण उपलब्ध करून देत या यशावर अधिक प्रगती साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ