शहरातील वाहतूक कोंडीसाठी रिक्षांची वाढ कारणीभूत?; नव्या परवान्यांवर निर्बंध आणणार Pudhari
पुणे

Pune Traffic Congestion: शहरातील वाहतूक कोंडीचे खापर रिक्षाचालकांवर! नव्या परवान्यांवर निर्बंध आणणार

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती; वाहतूक सुधारण्यासाठी महापालिका-पोलिसांचा संयुक्त अहवाल सादर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचा सकारात्मक परिणाम दिसत असून, वाहतुकीचा वेग 10 टक्क्यांनी वाढला आहे. शहरातील बॉटल नेक कमी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे खुले करण्यात आलेल्या ऑटो रिक्षांच्या परवान्यांवर निर्बंध आणावेत, यात शासनाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.(Latest Pune News)

शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनामार्फत संयुक्तरित्या प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्यातील प्रमुख 32 रस्ते आणि 22 जंक्शन येथील पाहणी करून वाहतूक कोंडीची कारणे शोधून त्याचा अहवाल देण्यात सांगितला होता. त्यानुसार हा आवाहल सादर करण्यात आला असून, त्या दृष्टीने कामेदेखील केली जात आहेत. या संदर्भात मंगळवारी महानगरपालिकेत गेल्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा महापालिका अधिकारी आणि पोलिसांची बैठक पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील वाहतूक सुधारणेसाठी संयुक्तपणे तयार करण्यात आलेला अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, महापालिकेमार्फत प्रमुख रस्त्यावरील व चौकामध्ये विविध सुधारणा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात प्रामुख्याने रस्त्याच्या मधोमध असलेले वीजेचे खांब शिफ्ट करणे, चौकातील अतिक्रमण काढून टाकणे अशी कामे सुरू आहेत. प्रामुख्याने आंबेडकर चौक, कर्वे रस्ता, धायरी फाटा, पौड रस्ता येथील कामे करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

मात्र, या बैठकीत महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीसाठी परस्परांना जबाबदार धरल्याचे समजते. या वेळी दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास यातून मार्ग निघेल, असा मध्यममार्ग काढला. मात्र, वाहतूक कोंडीसाठी रिक्षांची वाढती संख्या कारणीभूत असल्याचे खापर पोलिसांनी फोडले. यावर नव्या रिक्षा परमीटवर निर्बंध आणावेत, अशी विनंती शासनाला करणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले, की शहराची वाहतूक सुधारणेसाठी महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आहेत. रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभी असलेली वाहने, चौकांपासून काही अंतरांपर्यंत नो-पार्किंग व अतिक्रमणमुक्त रस्त्यांमुळे वाहतुकीची गती वाढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, यात आणखी सुधारणा होणे गरजेचे आहे.

शहरात मेट्रोचे जाळे वाढत आहे. पीएमपीच्या बस वाढवण्याचे देखील नियोजन आहे. दरवर्षी 4 लाख वाहने वाढत आहेत. त्यात शासनाने गेल्या काही वर्षात ऑटो रिक्षांचे परवाने खुले केले. यामुळे रिक्षांची संख्यादेखील लाखांच्या पुढे गेली आहे. हे परवाने असेच खुले राहिले तर भविष्यात त्यांनाच व्यवसाय मिळणे अडचणीचे होणार आहे. तसेच रस्त्यावरील वाहनेदेखील आणखी वाढणार आहेत. त्यामुळे शासनाने परवान्यांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार असल्याचे राम म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT