पुण्यात कचरासंकलनासाठी राबविला जाणार ‘इंदूर पॅटर्न’ Pudhari
पुणे

Indore Pattern: पुण्यात कचरासंकलनासाठी राबविला जाणार ‘इंदूर पॅटर्न’

महापालिका करणार इंदूरचा सल्लागार नियुक्त; यांत्रिक पद्धतीने गोळा केला जाणार कचरा

पुढारी वृत्तसेवा

Indore pattern for waste collection

पुणे: शहरात कचरासंकलनासाठी आता ‘इंदूर पॅटर्न’ लागू केला जाणार आहे. घरातून कचरा गोळा केल्यानंतर तो थेट वाहनांच्या मदतीने प्रक्रिया करण्यासाठी पाठविला जाणार आहे. कचरा फीडर पॉइंट बंद करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत हे पाऊल उचलले जात असून, यासाठी इंदूरचा सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. हा पॅटर्न शहरातील झोन 1 मध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून राबविला जाणार आहे.

शहरात, महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेचे 3 हजार 700 कर्मचारी 40 लाखांहून अधिक लोकांचा कचरा थेट घरातून गोळा करतात. शहरातील विविध सोसायट्यांमधून कचरा गोळा केल्यानंतर तो कचरा फीडर पॉइंटवर आणला जातो. तिथे तो वाहनांमध्ये टाकला जातो. शहरात असे अनेक फीडर पॉइंट आहेत, जे कचरा केंद्र बनले आहेत. (Latest Pune News)

अनेक फीडर पॉइंटवर दिवसभर कचरा पडून असतो. त्याच वेळी, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून प्रशासन विविध पावले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यात शहरातील फीडर पॉइंट्स काढून टाकून कचरा यांत्रिकरीत्या गोळा करून थेट कचरा प्रक्रिया केंद्रांवर पाठविण्याची योजना महानगर पालिकेमार्फत आखली जात आहे.

शहरातील कचर्‍याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अनेक भागात रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग दिसतात. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः शहराची पाहणी केल्यानंतर सांगितले की, शहरातील स्वच्छतेची समस्या गंभीर आहे. फीडर पॉइंट्स बंद केले जातील असेही त्यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत, शहरातील स्वच्छतेसाठी आता इंदूर पॅटर्न राबविला जाणार आहे. यासाठी, इंदूरस्थित सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर, महानगरपालिकेच्या झोन 1 मध्ये हा पॅटर्न राबविला जाणार आहे.

झोन 3 मध्ये ढोले पाटील रोड प्रादेशिक कार्यालय, येरवडा कलास धानोरी प्रादेशिक कार्यालय आणि नगर रोड प्रादेशिक कार्यालय यांचा समावेश आहे. कचरा गोळा करण्याची ही नवीन योजना या भागात राबविली जाणार आहे.

पुण्यातील फीडर पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार पावले उचलली जात आहे. याचाच एक भाग म्हणून इंदूरच्या धर्तीवर आम्ही ‘झोन एक’मध्ये पायलट प्रोजेक्ट राबवणार असून, यासाठी इंदूरच्या सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.
- संदीप कदम, प्रमुख घनकचरा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT