पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.८) पहाटेपासूनच चाकण दौऱ्यावर होते. दरम्यान ते चाकण चौकात पाहणी करताना पोलिसांनी वाहतूक रोखून ठेवली. यामुळे वाहनांची मोठी कोंडी झाली. यावरून अजित गरमीचा प्रचंड त्रास आणि वाहनांची वाढती रांग पाहून दादा संतापले. यावरून त्यांनी चांगलेच खडसावले.
अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी वाहतूक रोखून धरल्याने चौकात मोठी कोंडी झाली. हे पाहताच त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना जाहीरपणे खडसावले. "ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली? सगळी वाहतूक सुरू करा," अशा कठोर शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अचानक मिळालेल्या या फटकारामुळे पोलीस यंत्रणेतही हलचल निर्माण झाली. तर उपस्थितांनी हे दृश्य पाहताच परिसरात चर्चेचा विषय रंगला.
वाढत्या नागरीकरणामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांवर प्रचंड ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर, नियोजनबद्ध विकासासाठी प्रशासकीय विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे मत अजित पवार यांनी मांडले. चाकण येथील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आयोजित दौऱ्यात त्यांनी आणखी ३ महानगरपालिकेची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ही घोषणा पुणे जिल्ह्याच्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाला आणि विकासाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि निवासी पट्ट्यातील वाढता ताण लक्षात घेता, प्रशासकीय सोयीसाठी तीन नवीन महानगरपालिका स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
"वाढत्या लोकसंख्येला आणि विकासाला योग्य दिशा देण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे. काहींना हे आवडेल, काहींना नाही, पण भविष्याचा विचार करून हे कठोर निर्णय घ्यावेच लागतील," असे पवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तसेच पुण्यातील 'या' भागात होणार नव्या महानगरपालिका गरजेच्या असल्याचेही ते म्हणाले;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित केलेल्या तीन नव्या महानगरपालिकांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. या नव्या प्रशासकीय रचना खालीलप्रमाणे असतील:
मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची परिसर: पुणे शहराच्या हद्दीलगत वेगाने विकसित होणाऱ्या या भागासाठी एक एकत्रित महानगरपालिका.
चाकण आणि परिसर: राज्याच्या औद्योगिक पटलावर महत्त्वाचे स्थान असलेल्या चाकण आणि आसपासच्या औद्योगिक वसाहतींसाठी स्वतंत्र महानगरपालिका.
हिंजवडी आणि परिसर: देशातील प्रमुख आयटी हब असलेल्या हिंजवडी आणि लगतच्या परिसरासाठी एक विशेष महानगरपालिका.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामाच्या धडाकेबाज शैलीचे दर्शन घडवत आज पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनीचाकणमध्ये दाखल होऊन वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. "तुम्ही नागरिकांनी खूप त्रास सहन केला आहे, तुमची सहनशीलता कौतुकास्पद आहे. पण आता या त्रासातून तुमची सुटका करायची आहे," असे म्हणत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे तसेच पुणे-नाशिक मार्गावर उन्नत (Elevated) मार्ग उभारणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अजित पवारांची ही घोषणा केवळ पायाभूत सुविधांची निर्मिती नसून, पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय रचनेत आमूलाग्र बदल घडवणारी आहे. या नव्या महानगरपालिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम होतील आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यातील आव्हाने कशी पेलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एका हॉटेल मालकाने नाश्त्याची विनंती केली असता, "पुढच्या वेळी नक्की जेवेन, पण तेव्हा माझं बिल घेऊ नका," अशी मिश्किल टिप्पणी देखील अजित पवार यांनी यावेळी केली. मात्र, लगेचच त्यांनी व्यवसायात राजकारण आणू नये, असा मोलाचा सल्लाही दिला. "हॉटेलमध्ये कोणीही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल," असे ते म्हणाले.