Theatre Revenue Pudhari
पुणे

Pune Theatre Revenue: पुण्यातील नाट्यगृहांच्या उत्पन्नात मोठी तफावत; बालगंधर्वची ५० लाखांची कमाई, उपनगरांतील सभागृहांची स्थिती बिकट!

एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांची आकडेवारी समोर; विजय तेंडुलकर नाट्यगृहाला १.४२ लाख, तर मौलाना आझाद स्मारक सभागृहाला केवळ ३७ हजारांचे उत्पन्न

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: पुणे महापालिकेच्या नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होत असली, तरी उपनगरांतील नाट्यगृहे-सांस्कृतिक केंद्रांचा मात्र उत्पन्नाचा तुटपुंजा आकडा पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील बालगंधर्व रंगमंदिराने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत ५० लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले असताना सहकारनगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर नाट्यगृहाला अवघ्या १ लाख ४२ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले आहे. तर कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारकातील सभागृहाने तर केवळ ३७ हजार रुपयांची कमाई केली आहे.

उत्पन्‍नातील ही मोठी तफावत उपनगरांतील नाट्यगृहांच्या वापरावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या वास्तूंमध्ये कार्यक्रमांची वर्दळ वाढविण्यात महापालिकेला अपयश येत आहे का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पुणे महापालिकेची शहर आणि उपनगरात १६ नाट्यगृहे आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. ती नाट्यप्रयोग आणि कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिली जातात. एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील उत्पन्नाच्या आकडेवारीत मध्यवर्ती भागातील नाट्यगृहे आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि श्री गणेश कला क्रीडा रंगमंच यांनी प्रत्येकी ३७ लाखांहून अधिक, तर विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृहाने २१ लाखांहून अधिक उत्पन्‍न मिळविले आहे. पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, राजा रवी वर्मा कलादालनाने ११ लाख ७६ हजार रुपयांची, तर महात्मा फुले सांस्कृतिक भवनने (वानवडी) ८ लाख ५७ हजार रुपयांचे उत्पन्‍न मिळविले आहे.

पण, दुसरीकडे औंधमधील पं. भीमसेन जोशी कला मंदिराचे उत्पन्‍न अवघे ४ लाख ५० हजार, तर सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे कलाग्रामचे उत्पन्‍न ४ लाख ०८ हजार रुपये आहे. येरवडा, गंज पेठ आणि मालधक्का चौकातील सांस्कृतिक केंद्रांचे उत्पन्नही तुलनेने कमी आहे. त्यामुळे महापालिकेने उपनगरातील नाट्यगृहांचे उत्पन्‍न वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

कमी उत्पन्‍न असलेली काही उपनगरातील नाट्यगृहे

(एप्रिल ते सप्टेंबरदरम्यानचे उत्पन्न)

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंग्यचित्रकार कलादालन (स्वारगेट) - ५,१२,७०४

  • ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (गंज पेठ) - ३,५१, ७०४

  • साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कला मंदिर (येरवडा) - ३,२८,७१६

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) - २,०१,६३२

  • पं. भीमसेन जोशी कलादालन (सहकानगर) - ५८,१०२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT