Stray Dog Pudhari
पुणे

Pune Stray Dogs Menace: पुण्यात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला; महापालिकेत संतापाची लाट

श्वानहल्ल्यांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण; नगरसेवकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका बनत असून, या प्रश्नावर महापालिकेच्या सभागृहात तीव्र संताप व्यक्त झाला. श्वानहल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नगरसेवकांनी जोरदार टीका केली. वेळेत ठोस उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा देत नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि तातडीने कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याची मागणी केली. या वेळी अनेक नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करीत जाब विचारला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. या वेळी नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांनी शहरात भटक्या श्वानांच्या टोळक्यांचा वाढता वावर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट केले. चाकणमधील घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे त्यांनी नमूद केले. भटक्या श्वानांची ओळख पटत नसल्याने त्यांचे लसीकरण झाले आहे की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. तसेच, श्वानांच्या गळ्यात रिफ्लेक्टर पट्‌‍ट्यांचा अभाव असल्याने रात्रीच्या वेळी धोका अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्वानांची नोंदणी, लसीकरण मोहीम, निवारा केंद्रांची उभारणी आणि श्वान चावण्याच्या घटनांमध्ये तातडीने वैद्यकीय व आर्थिक मदत देण्याची त्यांनी मागणी केली. नगरसेवक कुणाल टिळक यांनी प्रभाग 25 मधील परिस्थिती मांडताना सांगितले की, भटक्या श्वानांच्या टोळक्यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज सुमारे 294 श्वानांची नसबंदी करण्याची क्षमता असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यांवरील श्वानांची संख्या कमी होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. प्रस्तावित निवारा केंद्रांची उभारणी नेमकी कधी पूर्ण होणार? याचा स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार गटाचे गटनेते काका चव्हाण यांनी सभागृहात ‌‘कुत्रे‌’ ऐवजी ‌‘श्वान‌’ हा शब्द वापरण्याची सूचना केली.

भाजपचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सारसबाग परिसरातील अनुभव सांगताना, काही ठिकाणी कारवाई होत असली तरी शहरभर समस्या गंभीर असल्याचे स्पष्ट केले. तक्रारीनंतर बाहेरील संस्थांकडून हस्तक्षेप होत असल्याने महापालिकेच्या कारवाईचे नियमित ऑडिट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात माणसांपेक्षा श्वानांची संख्या अधिक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. सभागृहनेते गणेश बिडकर यांनी देखील संकरित श्वानांचा मुद्दा उपस्थित केला. हे श्वान सर्वाधिक धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील त्यांनी केली. श्वानांवरील कारवाईसाठी डिजिटल डॅशबोर्ड तयार करण्याची सूचना केली. त्यामुळे प्रत्येक भागातील कारवाईची पारदर्शक माहिती उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

शहरात 3 लाख श्वान; प्रशासनाचा खुलासा

प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी माहिती देताना सांगितले की, जुन्या हद्दीत सुमारे 1 लाख 60 हजार भटके श्वान आहेत, तर नव्या हद्दीसह हा आकडा अडीच ते तीन लाखांपर्यंत पोहचू शकतो. आत्तापर्यंत सुमारे 3 लाख 30 हजार श्वानांची नसबंदी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. शिंदेवाडी, भूगाव आणि रामटेकडी येथे प्रत्येकी एक हजार क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, चावण्याच्या घटनांसाठी हेल्पलाइन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्वानांना खाऊ घालणे थांबविले पाहिजे

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी हा प्रश्न प्रत्येक प्रभागात गंभीर बनल्याचे मान्य करीत सध्याची यंत्रणा अपुरी असल्याचे स्पष्ट केले. केवळ दोन गाड्यांवर काम सुरू असल्याने अधिक मनुष्यबळ आणि वाहनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रस्त्यावर श्वानांना अन्न टाकणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT