बाणेर: बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे या पुणे शहराच्या उपनगरीय परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या त्रास प्रचंड वाढलेला आहे. सकाळी लवकर, संध्याकाळी व रात्री या मोठ्या संख्येने फिरणारी कुत्री, नागरिकांना चावणे, धावत्या वाहनांचा पाठलाग करून अपघात कारणे ठरणे अशा विविध तक्रारी वाढत आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. (Latest Pune News)
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा पूनम विधाते, विशाल विधाते, अजिंक्य निकाळजे आदी उपस्थित होते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या आहेत नागरिकांच्या मागण्या!
बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे या परिसरांमध्ये भटक्या कुर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, त्यांची तातडीने व्यवस्था करण्यात यावी. पुणे शहरातील इतर भागांमध्ये नसबंदी केलेली भटकी कुत्री पकडून बाणेर-बालेवाडी भागामध्ये सोडणार्यांवर कडक कारवाई करावी. भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी अधिक सक्रिय पथके, तात्काळ प्रतिसाद सेवा आणि सुसज्ज पुनर्वसन व्यवस्था निर्माण करावी.