प्रज्ञा केळकर-सिंग
शहरासह समाविष्ट गावांमधील भटक्या श्वानांची संख्या तीन लाखांपर्यंत पोहोचली असून, श्वानांची नसबंदी आणि लसीकरणासाठी महापालिकेतर्फे पाच वर्षांपूर्वी तीन संस्थांची नियुक्ती करण्यात आली. यापैकी एका खासगी संस्थेतर्फे गेल्या वर्षात 54 हजार श्वानांची नसबंदी आणि दीड लाख कुत्र्यांचे लसीकरण केल्याचा दावा आहे. इतर दोन संस्थांची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे भटक्या श्वानांच्या नियंत्रणाकडे महापालिका गांभीर्याने पाहते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे : समाविष्ट गावांसह शहरातील भटक्या श्वानांची संख्या सुमारे तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. भटक्या श्वानांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत आहे. श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदी, लसीकरण करण्यासाठी महापालिकेतर्फे तीन संस्थांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्वानांची वाढती संख्या आणि शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता नसबंदी, लसीकरणाची गती वाढवण्याचे आव्हान संस्थांपुढे निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी, कॅनाईन कंट्रोल अँड केअर (सीसीसी) आणि ब्ल्यू क्रॉस या तीन संस्थांमार्फत नसबंदी आणि लसीकरण केले जाते. यापैकी युनिव्हर्सल ॲनिमल सोसायटी या खासगी संस्थेला महापालिकेकडून एका श्वानामागे 1650 रुपये दिले जातात. इतर दोन संस्थांना महापालिकेची जागा देण्यात आली असून, त्यांच्यातर्फे नसबंदी, लसीकरण मोफत केले जाते. मात्र, श्वानांची वाढती संख्या आणि शहराचा झपाट्याने होणारा विस्तार पाहता वाहने आणि सेवक वर्ग अपुरा असल्याचे निदर्शनास आले आहे.
सीसीसी आणि ब्ल्यू क्रॉससह महापालिकेचा संयुक्त प्रकल्प असल्याने वेगळा खर्च करावा लागत नाही. शहरातील भटके श्वान पकडण्यासाठी महापालिकेची पाच आणि खासगी संस्थांची 18 वाहने कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परंतु, श्वानांची संख्या पाहता गाड्या अपुऱ्या असल्याचे दिसते. त्यामुळे अनेकदा श्वानांबाबत तक्रारी करूनही गाड्या येत नसल्याच्या आणि गाड्या आल्या तरी श्वान पकडले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीची होळकरवाडी, वडकी व कात्रज या ठिकाणी खासगी मालकीची तीन नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केंद्रे आहेत.
पुणे मनपाच्या जागेवर पाच वर्षे कालवधीसाठी संयुक्त प्रकल्पाद्वारे दुसरी कॅनाईन कंट्रोल अँड केअर या संस्थेमार्फत बाणेर, मोहननगर, नायडू हॉस्पिटल या ठिकाणी मोफत नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्याचे कामकाज चालू आहे. मुंढवा केशवनगर या ठिकाणच्या केंद्रात युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीचे मोफत कामकाज चालू आहे.
ब्ल्यू क्रॉस सोसायटी या संस्थेला मुंढवा केशवनगर येथील जागा 30 वर्षे कराराने मोफत नसबंदी शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी दिली.