निनाद देशमुख
पुणे : राजधानी दिल्लीप्रमाणेच पुण्यातसुद्धा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. शहरात तीन ते साडेतीन लाखांपेक्षा भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त असताना 2023 चा सर्व्हे पुढे करीत शहरात फक्त एक लाख 80 हजार भटकी कुत्री असल्याचा दावा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने केला आहे. भटक्या व मोकाट कुत्र्यांचा जन्मदर 42.87 टक्क्यांनी घटला. तसेच, शहरात 85 हजार 133 भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आल्याचा दावादेखील नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पर्यावरण अहवालात केला आहे. (Latest Pune News)
राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना कोंडवाड्यात दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या मुद्द्यावरून संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. या निर्णयाला प्राणिमित्रांनी विरोध केला आहे. पुण्यातदेखील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न गंभीर आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. शहरात नव्याने 32 गावांचा समावेश झाला असून, भटक्या कुत्र्यांची संख्या प्रत्यक्षात तीन लाखांपेक्षा जास्त असताना महापालिकेने 2023 चा सर्व्हे पुढे करीत शहरात केवळ एक लाख 80 कुत्री असल्याचा दावा केला जातो.
पुणे शहर 2030 पर्यंत रेबिजमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना अँटी रेबिजचे इंजेक्शन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. कात्रज, नायडू रुग्णालय, बाणेर, केशवनगर, वडकी, होळकरवाडी, अशा सहा ठिकाणी कुत्र्यांची नसबंदी केली जाते. दररोज 60 ते 180 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. त्यादृष्टीने महापालिककडून करण्यात येणार्या उपाययोजना मात्र तुटपुंज्या आहेत.
पालिका अधिकार्यांच्या दाव्यानुसार शहरात भटकी कुत्री पकडण्यासाठी 13 गाड्या आहेत. महापालिकेच्या 9, तर बाकी स्वयंसेवी संस्थांच्या आहेत. एकूण कर्मचारी 40 ते 50 आहेत. मात्र, प्रत्यक्षात कुत्री पकडण्याचे टार्गेट दिले जात नाही.
पाळीव कुत्र्यांसाठी आरोग्य पशुवैद्यकीय विभागाकडून डॉगपार्क करण्यात येणार आहे. यासाठी स. नं. 25.26 खराडी येथील जागादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या निवाराशेड अथवा कोंडवाड्यासाठी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही.
पुणे शहर 2030 पर्यंत रेबिजमुक्त करण्याचे आमचे नियोजन असून, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विशेष ड्राइव्हदेखील आयोजित करण्यात येत आहेत. पकडलेल्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून त्यांचे त्याच वेळी लसीकरणदेखील केले जात आहेत.- डॉ. सारिका फुंदे, पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका पुणे