पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने यंदा गतवर्षीपेक्षा जवळपास दुप्पट कारवाई करून कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे अवैधरीत्या मद्यनिर्मिती करण्यासह त्याची विक्री आणि वाहतूक करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर, एकूणच वाढलेल्या कारवाईमुळे यंदा महसुलामध्ये 369 कोटींची वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते मार्च 2021 या वर्षात 2 हजार 227 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 10 कोटी 26 लाख 90 हजार 676 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
मात्र, यंदा यात मोठी वाढ होऊन एप्रिल ते मार्च 2023 या वर्षात तब्बल 2 हजार 947 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 18 कोटी 14 लाख 19,177 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनावट मद्याची निर्मिती, त्याची वाहतूक आणि परराज्यातील परंतु राज्यात विक्रीसाठी परवानगी नसलेल्या मद्यविक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची नजर असते. अनेकदा परराज्यांतील दारू छुप्या पध्दतीने राज्यात विक्री केली जाते. यामुळे राज्याचा महसुली तोटा होतो. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी स्वतः लक्ष घालून अनेकदा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेषतः शहरातून जाणार्या महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षभरात म्हणजे एप्रिल ते मार्च 2023 या कालावधीत पुणे विभागाने 2 हजार 658 गुन्हे दाखल करून 2 हजार 947 आरोपींना अटक केली. तर, त्यांच्याकडून तब्बल 18 कोटी 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 2022-23 मध्ये देशी मद्य, बिअर व वाईनच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून, देशी मद्य विक्रीत यंदा 15 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. तर, बिअर आणि वाईनच्या विक्रीत अनुक्रमे 51 आणि 31 टक्के वाढ झाली आहे.