SRA Scam Pudhari
पुणे

SRA Scam: पिंपरी-चिंचवड एसआरए घोटाळा तापला; अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार दडपण्याचा गंभीर आरोप

टी.डी.आर. घोटाळे, नियमबाह्य मंजुरी आणि बिल्डर साठगाठ प्रकरणात चौकशीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विविध प्रकारांचे घोटाळे चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्या चौकशीला कात्रजचा घाट दाखवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) मात्र मोघम खुलासे करत या घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. एसआरएचे अधिकारीच आता या घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली एसआरएच्या अधिकाऱ्यांनी काही बिल्डरांना हाताशी धरून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हजारो कोटींचे टीडीआर घोटाळे केले असल्याचे दै. 'पुढारी'ने उघडकीस आणले. यामध्ये मिलिंदनगर एसआरए, विठ्ठलनगर-नेहरूनगर एसआरए, पिंपरी सॅनिटरी चाळ अशा काही योजनांचा समावेश आहे. एसआरएचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या काळातच या सर्व योजनांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता झाली आहे.

प्रामुख्याने बीएसयुपी योजनेतील झोपडपट्टीधारकांना पुन्हा टीडीआरची लूट, सरकारी जागेवर झोपडपट्टी नसतानाही झोपडपट्टी दाखवून योजना राबविणे, मर्जीतील बिल्डरांसाठी नियम धाब्यावर बसवणे असे अनेक गैरप्रकार दै. 'पुढारी'ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून समोर आणले होते. त्यामुळे या सर्व योजनांची चौकशी करून तत्कालीन सीईओ नीलेश गटनेसह दोषी अधिकारी व बिल्डरांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, एसआरएचे सीईओ सतीशकुमार खडके यांनी दै. 'पुढारी'ने प्रकाशित केलेल्या वृत्तावर खुलासा केला आहे. त्यांनी संबंधित योजनांमधील जे प्रश्न दै. 'पुढारी'ने उपस्थित केले होते, त्यांना बगल दिली असून कोणत्याही योजनेत घोटाळा अथवा गैरकारभार झाला नसल्याचा दावा करीत एसआरएच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले.

मिलिंदनगर स. नं. १४ चा गोलमाल खुलासा

मिलिंदनगर स. नं. १४ या जागेवर बीएसयूपी योजनेत झोपडपट्टीधारकांना घरे देण्यात आली असताना दुसरी योजना राबविण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेची एनओसी घेण्यात आली नाही. आधीच्या विकसकाचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केलेला नाही. असे असताना या योजनेची पात्रता झालेली नाही, तसेच टीडीआर दिले नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

पिंपरी पीडब्लूडीच्या जागेवर एसआरएचे मौन

पिंपरीतील सिटी स. नं. ३९२३ (पी), ४६६३ (पी) या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर असलेल्या सॅनिटरी चाळच्या जागेवर झोपडपट्टी नसताना झोपडपट्टी दाखवून आणि भाटनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील तात्पुरत्या संक्रमण शिबिरातील लाभार्थी दाखवून योजना मंजूर केली आहे. मात्र, या सगळ्या मुद्द्यांना बगल देण्यात आली असून, केवळ योजनेत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

विठ्ठलनगर-नेहरूनगर योजनेत दुबार लाभार्थी नसल्याचा दावा

पिंपरीतील विठ्ठलनगर-नेहरूनगर बीएसयूपी योजनेत घरे दिलेल्या १२४० लाभार्थी झोपडपट्टीधारकांना पुन्हा एसआरए योजनेत पात्र ठरवण्यात आल्याचे दै. 'पुढारी'ने उघडकीस आणले. त्यावर एसआरएने केलेल्या खुलाशात १२३३ पात्र झोपडीधारक असून, त्यात मोफत पुनर्वसनासाठी ४४७ तर सशुल्क पुनर्वसनासाठी ७८६ झोपडीधारक पात्र असल्याचे म्हटले आहे. तसेच योजनेत बीएसयूपीतील दुबार लाभार्थी नसल्याचा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT