Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply: दक्षिण पुण्यात पाणीटंचाईला दिलासा; पाण्याच्या टाक्या कार्यान्वित

उंड्री, कोंढवा, एनआयबीएम परिसरातील 4 लाख नागरिकांना टँकरमुक्त पाणीपुरवठ्याची आशा; 8 वर्षांनंतर प्रकल्प सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका हद्दीत समाविष्ट होऊनही गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वंचित राहिलेल्या दक्षिण पुण्यातील नागरिकांसाठी अखेर दिलासादायक घडामोड घडली आहे. महंमदवाडी, उंड्री, एनआयबीएम आणि कोंढवा परिसरातील पाण्याच्या टाक्या तब्बल आठ वर्षांनंतर कार्यान्वित करण्यात आल्या असून, 1 मे रोजी मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सुमारे 4 लाख नागरिकांना टँकरवरच्या अवलंबित्वातून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

दोराबजी हेरिटेज मॉल परिसरात उभारण्यात आलेल्या तीन पाण्याच्या टाक्यांमध्ये आता पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये प्रत्येकी 30 लाख लिटर क्षमतेच्या दोन आणि 15 लाख लिटर क्षमतेची एक अशी एकूण 75 लाख लिटर साठवण क्षमता आहे. 2018-19 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प विविध तांत्रिक अडचणी आणि नियोजनातील त्रुटींमुळे रखडला होता. दै. ‌‘पुढारी‌’ने विविध वृत्तांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि ‌‘समान पाणीपुरवठा योजने‌’अंतर्गत 19 कि.मी. मुख्य जलवाहिनी सुरू झाल्याने प्रकल्पाला गती मिळाली असून, 10 मेपर्यंत उर्वरित वितरण यंत्रणाही सुरू होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या 15 वर्षांपासून या भागातील नागरिकांना महापालिकेच्या पाण्याचा पुरवठा मिळत नव्हता. परिणामी, रहिवाशांना खासगी टँकर्सवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक सोसायट्या दरमहा लाखो रुपये खर्च करत होत्या. या पार्श्वभूमीवर टँकरमाफियांच्या हितसंबंधांमुळेच हा प्रकल्प रखडल्याचे आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत होते. या प्रकल्पामुळे दररोज सुमारे 600 टँकर्सची गरज कमी होणार असून, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर हा प्रकल्प महत्त्वाचा उपाय ठरणार आहे.

प्रकल्प पूर्ण करताना महापालिकेला जमिनीचे संपादन, कठीण भूप्रदेश, वीजखांबांचे स्थलांतर, वाहतुकीचे अडथळे आणि विविध तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत प्रकल्प यशस्वीरीत्या मार्गी लावण्यात आला आहे. 10 मेपर्यंत उर्वरित 4 कि.मी. जलवाहिनी आणि आणखी 5 टाक्या सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आमच्या पथकाने गेल्या आठवडाभर अहोरात्र मेहनत घेतली. जल विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम वेगाने पूर्ण करण्यात आले. अनेक वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पवनीत कोर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका
दोराबजी येथील पाणीटाकीच्या पाइपलाइनची तपासणी सुरू झाली असून, दूषित पाणी काढून टाकण्याचे कामही सुरू आहे. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हे शक्य झाले असून, नागरिकांना लवकरच स्वच्छ पाणी मिळेल.
प्राची आल्हाट, नगरसेविका, स्थायी समिती सदस्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT