लोणीकाळभोर: सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात वर्दळीच्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर या महामार्गांच्या उन्नत चौपदरी मार्गासाठी चौदा हजार कोटी रुपये तरतूद करताना, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही मार्गा एवढाच वर्दळीचा असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गाच्या उन्नत मार्गासाठी एकही पैशाची तरतूद न करता हा महामार्ग वंचितच ठेवला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते यवतदरम्यान उन्नत चारपदरी मार्ग उभारण्याबाबत गेल्या सुमारे दहा वर्षांपासून चर्चा आहे. सुरुवातील हा महामार्ग राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून उभारण्यात येणार होता, त्यांनी सविस्तर प्रकल्प अहवालही बनविण्यास घेतला होता, त्यानंतर हा मार्ग अचानक राज्य सरकारच्या रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारकडेच महामार्ग उभारणीचे काम आल्यामुळे अर्थसंकल्पात यावर तरतूद होईल अशी अपेक्षा असताना ती फेल ठरली आहे.
हडपसर- यवतदरम्यान या महामार्गावर प्रचंड वहातूक कोंडी ही दैनंदिन समस्या झाली आहे. रस्ता मोकळा मिळाला तर जे अंतर 20 ते 25 मिनिटात चारचाकीने पार होऊ शकते, त्यासाठी सध्या दोन ते अडीच तास लागत आहेत. रुग्णवाहिकांची मोठी अडचण यामुळे होतेच परंतु रोज या मार्गावरून प्रवास करणारे तसेच इतरही प्रवासी आणि स्थानिक नागरिक पूर्णपणे वैतागले आहेत. अर्थसंकल्पात या महामार्गाला स्थान दिले नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या महामार्गावर पूलगेटपासूनच वहातूक कोंडीला सुरुवात होते, त्यानंतर भैरोबा नाला ते हडपसर या भागात ही कोंडी जीवघेणी होते. हडपसरवरून कसेबसे बाहेर पडल्यानंतर मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळीकांचन, खेडेकरमळा या प्रत्येक ठिकाणी प्रचंड वहातूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या महामार्गानजीक प्रचंड मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले असल्याने अनेक ठिकाणी उजवीकडे वळणे आहेत, या प्रत्येक ठिकाणी महामार्गावरील वहाने अडून वहातूक कोंडीला सामोरे जावे लागते.