Pune smart toilets
पुणे : पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा शीण घालवता यावा, यासाठी पुण्याच्या प्रवेशद्वारांवर व पुणे स्टेशन परिसरात अत्याधुनिक व स्मार्ट स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. या स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चासाठी पालिकेकडून याठिकाणी जाहिरातींसाठी परवानगी दिली जाणार आहे.
या स्वच्छतागृहांमध्ये मॉल व मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर वायफाय, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंगचीही सुविधा दिली जाणार असून हे स्वच्छतागृह सःशुल्क असणार आहे. एक स्वच्छता उभारण्यासाठी पालिका ८६ लाख रुपये खर्च करणार आहेत. तर पाच स्वच्छतागृहांसाठी पालिका पाच कोटी ३१ लाख रुपये खर्च करणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एका बैठकीत प्रवाशांच्या सुविधेसाठी 'व्हीआयपी' स्वच्छतागृह उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरात सातारा रस्त्यावरील कात्रज चौक, पुणे- मुंबई रस्त्यावरील चांदणी चौक आणि बाणेर, अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली, सोलापूर रस्त्यावरील शेवाळेवाडी, पुणे विमानतळाजवळ आणि पुणे रेल्वे स्थानकाजवळ अशा सात ठिकाणी ही आधुनिक 'व्हीआयपी' स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आहेत. 'पे अँड यूज' तत्वावर ही स्वच्छतागृहे नागरिकांना व शहरात येणाऱ्या प्रवाशांना वापरता येणार आहेत. स्वच्छतागृहाची उभारणी व देखभाल दुरुस्तीसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून या ठिकाणी जाहिरातींचे हक्कही देण्याच्या विचारात पालिका आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
या आधुनिक 'व्हीआयपी' स्वच्छतागृहांमध्ये आंघोळीसाठी आवश्यक व्यवस्था, कपडे बदलण्यासाठी खोली आणि प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत. मोबाइल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा तसेच वायफाय सुविधादेखील येथे दिली जणार आहेत. महिला व पुरुषांसह तृतीयपंथी देखील हे स्वच्छतागृह वापरू शकणार आहेत. तर दिव्यांगांसाठी तेथे रॅम्प तयार केले जाणार असून स्वच्छतागृहाच्या देखभाल दुरुस्तीसाठी येथे कर्मचारी देखील नेमले जाणार आहेत.
पुण्यात महापालिकेमार्फत तब्बल १२०० स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. येथे वीज नसणे, पाणी नसणे, तुटलेली भांडी, फरशा व नळ, तुंबलेल्या मोऱ्या व दुर्गंधी असल्याने ही स्वच्छतागृहे वापरण्यास नागरिक टाळतात. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही ही स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कात्रज चौक, सातारा रस्ता - ८६.११ लाख
पुणे- मुंबई रस्ता, बालेवाडी - ८६.२५ लाख
शेवाळवाडी बस डेपो, पुणे- सोलापूर रस्ता - ८६.३५ लाख
पुणे रेल्वे स्टेशन - ८६.०८ लाख
वाघोली, पुणे- नगर रस्ता - ८६.४० लाख