Sinhagad Institutes Pudhari
पुणे

Sinhgad Education Society Property Tax Dues: सिंहगड शिक्षण संस्थेच्या २३० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम; मिळकती सील करून लिलावाची तयारी!

महापालिकेच्या महसूल समितीचे प्रशासनाला कडक निर्देश; २८ मिळकतींना नोटिसा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वर्गखोल्या कारवाईतून वगळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या तिजोरीला २३० कोटींचा चुना लावणाऱ्या सिंहगड शिक्षण संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी आता प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. नोटिसा बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या संस्थेविरोधात आता थेट कारवाई करण्याचे आदेश महसूल समितीने दिले आहेत. संबंधित मिळकती सील करण्यापासून त्या ताब्यात घेण्यापर्यंत आणि पुढे लिलावाची प्रक्रिया राबविण्यापर्यंतची तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे सिंहगड संस्थेच्या मिळकतकर थकबाकीप्रकरणी महापालिका आता प्रत्यक्ष कारवाई करणार का? याकडे लक्ष लागले आहे. सिंहगड शिक्षण संस्थेकडे मिळकतकराची सुमारे २३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीसाठी कर संकलन विभागाने संस्थेच्या २८ मिळकतींना यापूर्वीच नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, नोटिसांनंतरही अपेक्षित वसुली न झाल्याने महसूल समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

थकबाकी वसुलीसाठी केवळ नोटिसांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता आठ दिवसांत ठोस कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गरजेनुसार मिळकती सील कराव्यात, त्यांचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि त्यानंतर लिलावाची कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या कारवाईत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता घेण्याचेही निर्देश आहेत. त्यानुसार वर्गखोल्या वगळून संस्थेच्या अन्य मिळकतींवर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे. महसूल समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.

२८ मिळकती प्रशासनाच्या रडारवर!

सिंहगड शिक्षण संस्थेकडे २३० कोटींची थकबाकी आहे. संस्थेचे १२८ विविध शैक्षणिक संस्था असून, करसंकलन विभागाकडून यातील २८ मिळकतींना नोटिसा देण्यात आल्या आहेत. कारवाईसाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच, यानंतर मिळकती सील करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आवश्यकतेनुसार मिळकतींचा ताबा घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच, थकबाकी वसुलीसाठी लिलावाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारवाईतून वर्गखोल्या वगळल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT