पुणे: नवोदित कलाकारांसाठी मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित केलेल्या सोळाव्या पुणे लघुपट महोत्सवात 'आगमन' हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला, तर 'फिंगर रिंग' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले आणि 'कासरा' या लघुपटाची सर्वोत्कृष्ट पटकथालेखन म्हणून निवड करण्यात आली.
रविवारी झालेल्या या महोत्सवाचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ लेखक पत्रकार सुभाषचंद्र जाधव, चित्रपट दिग्दर्शक-निर्माते निखिल मित्तल आणि ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर या वेळी उपस्थित होते. महोत्सवात विविध देशांतील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन करण्यात आले.
'हिरवा सोनं' हा लघुपट सर्वोत्कृष्ट मराठी लघुपट ठरला, तर 'शाडो' या लघुपटासाठी स्टॅन्ली यांना सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. 'लास्ट ब्ल्यूम' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी पटकथेचा पुरस्कार देण्यात आला. 'इनोसंट ट्रॅव्हल' या राजीव मलिकदिग्दर्शित लघुपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली, तर 'जोन्स' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुपट म्हणून निवडण्यात आले. '
कलयुग' हा सर्वोत्कृष्ट ॲनिमेशनपट ठरला, तर 'ज्योती' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. या लघुपटासाठी अनंत केनी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचे पारितोषिक मिळाले. 'पेज बाउंड' लघुपटाला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपटाचे पारितोषिक मिळाले, तर 'फॉरगॉटन नोट्स' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी दिग्दर्शनाचे पारितोषिक देण्यात आले.
'लेडी बग्स' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पटकथालेखन, तर माहितीपट विभागांमध्ये 'रिपल्स ऑफ गंगा' हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. 'डिवाइन पेन' या लघुपटासाठी करन वाजीराणी यांना सर्वोत्कृष्ट माहितीपट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. 'आखाडाच्या महिन्यात' या लघुकथासाठी भाग्यश्री मोटे यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक दिग्दर्शक म्हणून गौरविले. 'द इंट्रुडर' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपटाचा पुरस्कार मिळाला.