पुणे : मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असतानाच गुरुवारी (दि. ११) शहराला अक्षरशः हुडहुडी भरली. पाषाण भागाचा पारा ७, तर शिवाजीनगरचा ७.९ अंशांवर खाली आला होता. त्यामुळे रात्रपाळीच्या नोकरदारांना दुहेरी गरम कपडे परिधान करावे लागले, इतका गारठा जाणवत होता.
शहराचे किमान तापमान ११ ते १३ अंशांवरून गुरुवारी थेट ७ अंशांवर खाली आले. सायंकाळी ५ वाजता बोचरे गार वारे सुटल्याने आज प्रचंड गारठा जाणवणार याचा अंदाज आला. रात्री ८ नंतर चांगलाच गारठा सुटल्याने चौका-चौकात शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या. तसेच नागरिकांनी गरम कपडे घालून चहा, गरम दूध घेणे पसंत केले.
पाच वर्षांतील वेगळा गारठा
गत तीन ते चार वर्षांत डिसेंबर महिन्यात थंडीच पडली नव्हती. कारण अवकाळी पावासामुळे किमान तापमानात फारशी घट नव्हती. रात्रीचे तापमानही ११ अंशांखाली गेले नव्हते. सन २०१९ नंतर अशी थंडी पुणेकरांनी गुरुवारी प्रथमच अनुभवली. असे वातावरण १९ डिसेंबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गुरुवारचे शहराचे किमान तापमान
पाषाण ७, शिवाजीनगर ७.९, लोहगाव १२.७, चिंचवड १४,१, लवळे १६.२, कोरेगाव पार्क १२.७