Pune Illegal School Transport Pudhari
पुणे

Pune Illegal School Transport: पुण्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ; पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनांतून शालेय वाहतूक सुरू

लक्ष्मी रस्त्यावर पाहणीत धक्कादायक प्रकार उघड; नियमबाह्य वाहनांवर आरटीओची कारवाई मोहीम राबविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: मध्यवस्तीतील शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनांतून नियमबाह्य आणि सुसाट वाहतूक होत असल्याचे चित्र गुरुवारी लक्ष्मी रस्त्यावर पाहायला मिळाले. 'विद्यार्थ्यांची सुरक्षा फर्स्ट' या उपक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ३०) लक्ष्मी रस्त्यावरील शाळेबाहेर सायंकाळी पाहणी करण्यात आली. त्या वेळी सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता सर्रासपणे बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे या वेळी दिसले.

​मोटार वाहन कायद्यानुसार शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी अधिकृत शालेय वाहतूक परवाना वाहनाला पिवळा रंग, अग्निरोधक यंत्र आणि आपत्कालीन दरवाजा यांसारख्या सुरक्षा नियमांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

मात्र, या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत खासगी गाड्यांमधून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केली जात असल्याचे पाहायला मिळाले. तसेच, अशा प्रकारे विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याचे उपनगरीय भागात देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आपल्याकडील पथके तैनात करून धडक कारवाई मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट नियमावली जाहीर केली आहे. पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनांतून व्यावसायिक अथवा शालेय वाहतूक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मध्यवस्तीतील सर्व शाळांबाहेर आरटीओच्या पथकाद्वारे विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त केली जातील.
संदीप खडसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आरटीओने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत, धोकादायकरीत्या आणि विनापरवाना वाहनातून वाहतूक करणे हे चुकीचे आहे. आरटीओने दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले नसेल, तर संबंधित वाहनावर धडक कारवाई व्हायला हवी. अशा वाहनांना आरटीओने तत्काळ जप्त करून निलंबित करावे.
आनंद सप्तर्षी, पालक
पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या खासगी वाहनातून विद्यार्थी वाहतूक करणे हे बेकायदेशीर आहे. याकडे प्रशासनाने अजिबात दुर्लक्ष करू नये. हे विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्यासारखे आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्याची यामुळे मोठी शक्यता आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने तातडीने अशा वाहनांवर धडक कारवाई करावी. तसेच, पालकांनीही आपले पाल्य अधिकृत वाहनातून प्रवास करत आहे की नाही, याची तपासणी करावी. याशिवाय शाळा प्रशासनाने सुद्धा विद्यार्थ्यांची वाहतूक होत असलेल्या वाहनांची पाहणी करणे गरजेचे आहे.
एकनाथ ढोले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT