पुणे: ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. ससूनमधील मर्यादित खाटा, मनुष्यबळ यामुळे आरोग्यसेवा देण्यात अडचणी येतात. मात्र, कर्करोग रुग्णालयाची जागा मिळण्याबाबत सकारात्मकता, अतिरिक्त खाटांच्या मंजुरीचे आश्वासन यामुळे आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यातील ससूनची जागा परत मिळण्याच्या प्रस्तावालाही ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील जागा सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यात आहे. ही जागा एनआयव्हीला भाडे करारावर देण्यात आली होती. (Latest Pune News)
हा करार पुढील वर्षी संपुष्टात येणार असून, सुमारे 8,311 चौरस मीटर भूखंड ससूनला परत मिळावा, असा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभाग व पुणे जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
आंबेडकर रस्त्यावरील जमीन पूर्वी 99 वर्षांच्या करारावर एनआयव्हीला देण्यात आली होती. करार 2001 मध्येच संपुष्टात आला. त्यानंतर पुन्हा 25 वर्षांचा करार करण्यात आला आणि तो करार पुढील वर्षी संपत आहे. एनआयव्हीची पाषाणला स्वत:ची जागा असून, तेथे प्रयोगशाळा कार्यरत आहेत.
सध्याच्या जागेवर प्रामुख्याने प्रशासकीय कार्यालय आहे. त्यामुळे कार्यालये पाषाणला स्थलांतरित करून जागा ससून रुग्णालयाला परत मिळावे, याबाबत प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिले. जागा परत मिळण्याची मागणी बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस (इव्हिक्शन) अॅक्ट, 1955 व त्याच्या 2007 मधील सुधारित नियमांनुसार करण्यात आली आहे.
नवीन जागेत कोणत्या आरोग्य सुविधा?
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ससूनला नवीन पायाभूत सुविधा वाढवणे आवश्यक आहेत. एनआयव्हीच्या ताब्यातील जमीन परत मिळाल्यावर तेथे फिजिओथेरपी कॉलेज, दंतचिकित्सा महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी धर्मशाळा उभारण्याचे नियोजन आहे.
अतिरिक्त खाटांना मंजुरी मिळणार
ससूनच्या नवीन 11 मजली इमारतीत 504 अतिरिक्त खाटा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ससूनमधील 1296 खाटांना मंजुरी असून तितक्या खाटांसाठी भरण्यात आलेले मनुष्यबळ अतिरिक्त सेवा देत आहे. त्यामुळे अतिरिक्त खाटांना मंजुरी मिळावी, यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. खाटांनाही लवकरात लवकर मंजुरी मिळण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
एनआयव्हीच्या ताब्यातील जागा सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जागेसाठी आम्ही सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे सध्या खासगी रुग्णालयांवर नाईलाजाने अवलंबून राहावे लागत असलेल्या रुग्णांना दिलासा मिळेल. आम्ही शिवाय दंत व फिजिओथेरपी महाविद्यालयासाठीही परवानगी मागितली आहे. जागेचा भाडे करार संपत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून समजले. ससूनमधील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य सेवेच्या विस्तारासाठी जागेची गरज आहे.- डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बीजे शासकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय