पुणे: सकाळी शहर जागे होण्यापूर्वीच काहीजण कामाला लागतात. ते कार्यालये, बँका, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि खासगी कंपन्या स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभर राबतात. इतरांना स्वच्छ, प्रसन्न आणि सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून, जिवाचे रान करणाऱ्या या सफाई कामगारांच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र आर्थिक विवंचना, अपुरी कमाई आणि असुरक्षित भविष्य, असे वास्तव आहे.
'महिनाभर राबून हातात पडतात फक्त १३ हजार रुपये. त्यात घर कसं चालवायचं?' हा प्रश्न सुमित भिंगारे यांच्यासारख्या असंख्य सफाई कामगारांसमोर रोज उभा असतो. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी दिवसभर कंपनीत सफाईचे काम सुमित करतात. 'स्वतःचं छोटंसं घर आणि एक गाडी घ्यायची आहे. स्वप्नं मोठी आहेत, पण पगार खूपच कमी आहे. तरीही मेहनतीवर विश्वास आहे. एक दिवस ही स्वप्नं नक्की पूर्ण होतील,' असे सुमित सांगतात.
सफाई कामगारांचे काम केवळ झाडू मारण्यापुरते मर्यादित नसते. मजले पुसणे, स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे, कचरा गोळा करणे, काचांच्या खिडक्या स्वच्छ करणे, फर्निचरची धूळ झटकणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहणे, कार्यक्रमांनंतर अतिरिक्त स्वच्छता करणे अशी अनेक कामे त्यांना दिवसभर करावी लागतात. अनेक ठिकाणी कामाचे तास निश्चित नसतात. मात्र, त्याबदल्यात अतिरिक्त मोबदला मिळेलच, याची खात्री नसते. या कामात सतत फिनाइल, डिटर्जंट, ब्लीचिंग पावडर आणि इतर रसायनांचा संपर्क येत असल्याने आरोग्याच्या समस्याही त्यांना उद्भवतात. काही संस्थांमध्ये हातमोजे, मास्क आणि बूट दिले जातात; मात्र, अनेक ठिकाणी ही साधनेही त्यांना स्वतःच्या पैशांतून खरेदी करावी लागतात. नियमित आरोग्य तपासणी किंवा वैद्यकीय विम्याची सुविधाही अनेकांना मिळत नाही.
रामचंद्र (नाव बदलले आहे) सांगतात, गेल्या अनेक वर्षांपासून सफाईचे काम करत आहे. पत्नी आणि दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ काम करतो. पगार अवघा १३ हजार रुपये. पत्नी नोकरी करते म्हणून संसार कसाबसा चालतो. घरभाडे, वीजबिल आणि मुलांच्या खर्चातच सगळे पैसे संपतात. सफाईच्या कामात पुरेसा पैसा नाही. पण, कामाच्या ठिकाणी आदर मिळत नाही.
आम्हालाही माणूस म्हणून सन्मान हवा
महागाईच्या वाढत्या झळा, कंत्राटी पद्धतीची असुरक्षित नोकरी, अपुरे वेतन आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे या कामगारांचे आयुष्य रोज नव्याने संघर्ष करत पुढे सरकत आहे. वेळेवर वेतन, योग्य पगार, महागाई भत्ता, पीएफ, विमा, कायमस्वरूपी नोकरी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या श्रमाला सन्मान मिळावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या कष्टांकडे केवळ सफाई कर्मचारी म्हणून नव्हे, तर प्रत्येक संस्थेच्या भक्कम पायाचा आधार म्हणून पाहण्याची गरज आज निर्माण झाली आहे.