पुणे: जिल्ह्यातील विकास सोसायट्या पारंपरिक पीक कर्जवाटपाबरोबरच आता विविध व्यवसायांमध्येही सक्रिय झाल्या आहेत. बी-बियाणे, खते आदी निविष्ठांची शेतकऱ्यांनी विक्री करणे, कॉमन सर्विस सेंटर, मिनरल वॉटर प्रकल्प सुरू करणे अशा व्यवसायांमध्ये विकास सोसायट्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांना गावातच सुविधा मिळण्याबरोबरच त्याचा फायदा सोसायट्यांनाही होऊ लागला आहे. अशा नव्या पर्यायामुळे विकास सोसायट्यांनी कात टाकण्यास सुरुवात केली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी दिली. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्यात सद्यःस्थितीत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तथा विकास सोसायट्यांची संख्या 1 हजार 364 इतकी आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 1 हजार 192 विकास सोसायट्यांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त संगणकीकरण प्रकल्पातून पुणे जिल्ह्यातील 158 विकास सोसायट्यांचा समावेश करण्यात आला असून उर्वरित 14 संस्थांचे संगणकीकरण हे तिसऱ्या टप्प्यात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्रिस्तरीय पतरचनेत राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि गावातील विकास सोसायट्यांद्वारे कामकाज चालते. त्यामध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांना होणारे पीक कर्जवाटप हे विकास सोसायट्या करत असतात. पुणे जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात होणारे पीक कर्जवाटप करण्यात सोसायट्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. सोसायट्यांच्या संगणकीकरणात जिल्ह्यात विकास सोसायट्यांनीसुद्धा हिरीरीने भाग घेतला. त्यामुळेच सहकार आयुक्तालयाने निश्चित केल्यानुसार पहिल्या टप्प्यात 1 हजार 192 सोसायट्यांचे संगणकीय कामकाज पूर्ण झाले आहे. याकामी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केलेल्या पाठपुराव्याला व नियंत्रणाला चांगले यश आले. त्यामध्ये तालुका सहाय्यक निबंधक, लेखापरीक्षक विभागासह सोसायट्यांचे अध्यक्ष व संपूर्ण संचालक मंडळ आणि सोसायट्यांच्या सचिवांचेही चांगले योगदान राहिल्याचे जगताप म्हणाले.
जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांची माहिती
बी-बियाणे, खते, मिनरल वॉटरसह कॉमन सर्विस सेंटर कार्यान्वित
दुसऱ्या टप्प्यात 158 विकास सोसायट्यांचे संगणकीकरण होणार
जिल्ह्यातील विकास सोसायट्यांची व्यवसायाकडे वाटचाल वाढली
बी-बियाणे, खते, औषधे
आदी निविष्ठांचे 51 सोसायट्यांमध्ये काम सुरू
जेनेरिक औषधे विक्रीत उतरल्या 4 विकास सोसायट्या
कॉमन सर्विस सेंटर व्यवसाय
सुरू करण्यासाठी 704 सोसायट्यांची नोंदणी
प्रत्यक्षात 245 कॉमन सर्विस सेंटर कार्यान्वित झाल्याने गावातच नागरिकांना सुविधा
मिनरल वॉटर प्रकल्प 3 सोसायट्यांकडून सुरू
एका सोसायटीला ऑईल कंपन्यांकडून पेट्रोल पंपाचे वाटप, लवकरच कार्यान्वित होणार
पीक कर्जाशिवाय व्यवसायभिमुखता वाढल्याने सोसायट्यांची वार्षिक उलाढाल वाढणार