पुणे : ज्या शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही नाही अशा शालेय वाहनांची फिटनेस तपासणी पुणे आरटीओकडून थांबविण्यात आली आहे. तसेच, सीसीटीव्ही नसलेल्या आणि फिटनेस नसलेल्या शालेय वाहनांवर कारवाई करायलादेखील आरटीओने सुरुवात केली आहे. (Pune Latest News )
विद्यार्थ्यांसोबत घडणार्या संवेदनशील घटनांना रोखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी आरटीओची बैठक घेत शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला शालेय वाहतूक करणार्या वाहनचालकांनी केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ने नुकतीच शहरात पाहणी केली. त्या वेळी बहुतांश स्कूलबस, स्कूल व्हॅन आणि शालेय रिक्षांमध्ये सीसीटीव्हीच नसल्याचे पाहायला मिळाले. त्यासंदर्भातील सचित्र वृत्त दै. ‘पुढारी’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पुणे आरटीओने आता कडक पावले उचलली आहेत. सीसीटीव्ही नसणार्या शालेय वाहनांची फिटनेस तपासणीच बंद केली आहे. याशिवाय फिटनेस तपासणी नसलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात येणार आहे