पुणे: शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल, तसेच आरक्षित प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या लॉटरीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या सोमवारी (दि. 6 एप्रिल 2026) सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरण येथे लॉटरीचे थेट प्रक्षेपण यू-ट्यूबद्वारे करण्यात असून, पालकांना याची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील हजारो पालकांनी आपल्या मुलांच्या आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले असून, या सर्व अर्जांमधून संगणकीय पद्धतीने पारदर्शक लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी अधिकृत पोर्टलवर जाहीर केली जाणार आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, या प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता नाही. पालकांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निश्चित कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
वेळेत कागदपत्रे सादर न केल्यास पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल. दरम्यान, पालकांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
यंदा राज्यातील आठ हजार 701 शाळांमध्ये 1 लाख 14 हजार 833 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी 2 लाख 88 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. गेल्यावर्षी या प्रवेशासाठी जवळपास तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यंदा अर्जाच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.