Road Potholes Pudhari
पुणे

Pune Road Potholes: पुण्यातील खड्ड्यांवर महापालिकेची युद्धपातळीवरील मोहीम; ७२ तासांत दुरुस्तीचे आदेश

पीएमसी रोड मित्र ॲपवर तक्रार नोंदवा; विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील डांबर मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे वाहतुकीसाठी धोकादायक बनले असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला युद्धपातळीवर खड्डे दुरुस्तीची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांना पीएमसी रोड मित्र ॲपवर खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्याचे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले. पाऊस थांबल्यानंतर संबंधित तक्रारीवर ७२ तासांच्या आत कार्यवाही झाली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पाऊस थांबताच शहरातील सर्व धोकादायक खड्डे ७२ तासांच्या आत तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात यावेत, तसेच प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

याशिवाय, पावसाळा संपल्यानंतर शहरातील खराब झालेल्या सर्व रस्त्यांच्या पुनर्डांबरीकरणासाठी विभागनिहाय आणि कालबद्ध कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करून तो सार्वजनिक करावा, असे निर्देशही भिमाले यांनी दिले.

रस्ते दुरुस्तीची कामे प्रभावीपणे होण्यासाठी आवश्यक डांबराचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, पर्यायी साहित्याचा वापर करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि आपत्कालीन यंत्रणा कायम सज्ज ठेवण्यावरही त्यांनी भर दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT