पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, आत्तापर्यंत सुमारे ४५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) हा प्रकल्प राबवत असून, राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक शहराबाहेर वळवून शहरातील वाहतूक सुरळीत करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम भागाचे काम २०२७ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आहे. एमएसआरडीसीकडून कामाचा नियमित आढावा घेतला जात असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नियोजनानुसार पश्चिम भाग २०२७ मध्ये, तर पूर्व भाग २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवल्याची माहिती पुणे रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीबरोबर बोलताना दिली.
प्रशासनाने प्रकल्पाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रत्येक टप्प्यात दर्जेदार कामाला प्राधान्य दिले जात असून, रिंगरोड पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक कोंडीत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच वाहनचालकांचा इंधनखर्चही वाचणार आहे.
सुमारे १७३ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड पुणे शहर आणि उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या मार्गामुळे सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्याची गरज राहणार नाही. परिणामी, वाहतूक कोंडी आणि वायुप्रदूषणात सुमारे २५ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूर्व भागातील काम १२ पॅकेजमध्ये विभागण्यात आले असून, त्यापैकी नऊ पॅकेजमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे. उर्वरित तीन पॅकेजना मंजुरी मिळाली असून, लवकरच काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, चिंबळी, उर्से आणि शेलारवाडी परिसरात सध्या काम वेगाने सुरू आहे. प्रत्येक पॅकेजसाठी ३० महिन्यांची मुदत निश्चित केली असून, विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे.