पुणे; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्याच्या मुहूर्तावर यंदा पुणेकरांनी 9 हजार 974 वाहनांची खरेदी केली. यात 5 हजार 578 दुचाकी, तर 2 हजार 910 चारचाकींचा समावेश आहे. दरम्यान, 669 इलेक्ट्रिक वाहनांची देखील पुणेकरांनी खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओत करण्यात आली आहे.
यंदा दसर्याच्या आदल्या दिवशीपर्यंत वाहनांची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दि. 15 ते 23 ऑक्टोबर 2023 या आठ दिवसांच्या कालावधीत पुणे आरटीओ कार्यालयात वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू होते. या कालावधीत एकूण 9 हजार 974 वाहनांची पुणे शहरात खरेदी केल्याची नोंद करण्यात झाली आहे.
तर, गेल्या वर्षी दि. 27 नोव्हेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 9 हजार 812 वाहनांची खरेदी केली होती. यावरून यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिक वाहनांची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. दसर्याच्या मुहूर्तावर नागरिक नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. याच मुहूर्तावर पुणेकरांनी गेल्या आठ दिवसांपासून ही वाहन खरेदी करण्याची तयारी केली होती. ही सर्व वाहने पुणेकर आज (दि.23) दसर्याच्या मुहूर्तावर आपापल्या घरी नेण्याच्या तयारीत आहेत. तसेच, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचारी, अधिकारीवर्गाकडून वाहनांची नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन, नागरिकांना वेळेत वाहने मिळावीत, याकरिता मेहनत घेण्यात येत आहे.
यंदा वाहनांच्या खरेदीमध्ये 14 ते 15 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आम्हाला पाहायला मिळाले आहे. आमच्याकडे 80 टक्के स्कूटर आणि 20 टक्के मोटारसायकलची विक्री होत असते. यात 125 सीसीच्या स्कूटरमुळे आमचा सेल वाढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वाहनविक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– प्रदीप सावंत, सीईओ, शेलार ऑटोमोटिव्ह प्रा.लि.
स्कोडा, स्लाव्हिया, कुशाक, कोडॅक हे चारचाकींचे विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये आमच्याकडील नवीन लाव्हा ब्लू कलर्सच्या चारचाकींना भरपूर मागणी आहे. भांडारकर रोड, पिंपळे गुरव आणि अहमदनगर येथील तीनही शोरूमला नागरिकांचा वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दसर्याचा मुहूर्त साधत अनेक नागरिक खरेदीसाठी येत आहेत. कुशाक आणि स्लाव्हिया या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे.
– अनिकेत गारवे, एमडी, गारवे स्कोडा
2022
वाहनप्रकार : खरेदी वाहन संख्या
मोटारसायकल : 5308
कार : 3112
रिक्षा : 317
गुडस : 221
टॅक्सी : 24
बस : 93
इलेक्ट्रिक वाहने : 721
एकूण वाहने : 9,812
2023
वाहनप्रकार : खरेदी वाहनसंख्या
मोटारसायकल : 5578
कार : 2910
रिक्षा : 238
गुडस : 275
टॅक्सी : 270
बस : 34
इलेक्ट्रिक वाहने : 669
एकूण वाहने : 9,974
विजयादशमीचा मुहूर्त साधत शहरातील नागरिकांनी सदनिका तसेच मालमत्ता खरेदी केली. शहरातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात एकूण 1300 दस्तनोंदणी झाली. त्याच्या माध्यमातून 50 कोटींहून अधिक महसूल मिळाला, अशी माहिती शहराचे सह दुय्यम निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली.