Pune Kharif Sowing Update Pudhari
पुणे

Pune Kharif Sowing Update: जिल्ह्यात खरीप पिकांच्या ७५ टक्‍के पेरण्या पूर्ण

भात लावण्या पोहोचल्या ४९ टक्‍क्‍यांवर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या आता संपुष्टात आल्या असून, सद्यस्थितीत सरासरी क्षेत्राच्या ७५ टक्‍क्‍यांइतक्या पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. जिल्ह्यात भातपिकाखालील सरासरी क्षेत्र ६१ हजार १०१ हेक्टर इतके आहे.

त्यापैकी निम्म्या म्हणजे ३० हजार २३९ हेक्टरवर (४९ टक्‍के) भात लागवडी पूर्ण झालेल्या आहेत. जिल्ह्यात भाताची लागवड यापुढे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. सरासरी क्षेत्र ओलांडून सोयाबीनची ११६ टक्‍के पेरण्या झाल्याचेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील खरिपातील पिकांखालील सरासरी क्षेत्र २ लाख २ हजार २६३ हेक्टरइतके आहे. सद्यस्थितीत १ लाख ५१ हजार ३२५ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ७५ टक्‍के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

यापुढे आता खरीप पिकांच्या पेरण्यांचा हंगाम संपलेला आहे. पेरलेली पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत. जून महिन्यात पाणी उपलब्धतता असलेल्या ठिकाणीच भात रोपवाटिका टाकण्यात आल्या होत्या.

मात्र, जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर रोपवाटिकांचे प्रमाण वाढले. त्यामुळे सुरुवातीच्या रोपवाटिकांमधील तयार भातरोपांच्या लागवडीने जिल्ह्यात सध्या वेग घेतलेला आहे. त्यामुळे संपूर्ण सरासरी क्षेत्रावरील भात लागवडी पूर्ण झाल्यावर पेरण्यांचा एकूण टक्‍का निश्चित वाढेल, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात बाजरी पिकाखालील क्षेत्र ३८ हजार ७३१ हेक्टर असून, प्रत्यक्षात ३१ हजार ८८२ टक्‍के (८२), मक्याचे क्षेत्र २६ हजार ३६२ हेक्टर असून, २२ हजार ८३३ हेक्टरवर म्हणजे ८७ टक्‍के पेरण्या पूर्ण झाल्या. कडधान्यांमध्ये मूग पिकाखाली सर्वाधिक १० हजार ६२७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ हजार ६९४ म्हणजे ४४ टक्‍के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे मुगाचे क्षेत्राऐवजी सोयाबीनच्या पेरणीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकाखाली ४० हजार १०० हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात ४६ हजार ८६० म्हणजे ११६ टक्‍के पेरण्या पूर्णझालेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT