पुणे: राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात पुणे जिल्ह्याने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, घरखरेदीदारांची पसंती पुण्याकडे झुकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) पुण्यातील तब्बल 3,150 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक ठरली असून, पुणे रिअल इस्टेट मार्केटचे केंद्र म्हणून मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
‘महारेरा’च्या ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 10,379 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी मोठा वाटा पुण्याचा असल्यामुळे गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांचा विश्वास या शहरावर वाढत असल्याचे दिसते.
याशिवाय 4,204 प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आले असून, 2,488 प्रकल्पांच्या दुरुस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 3,687 प्रकल्पांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत विकसकांनी सादर केलेल्या सुधारित आराखड्यांचा आणि कालमर्यादेचा बारकाईने आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) 5,494 प्रकल्पांसह आघाडीवर असला, तरी वैयक्तिक जिल्हा म्हणून पुण्याने सर्वाधिक प्रकल्पांची नोंद करून आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. पुण्याने ठाणे येथील 1,714 आणि मुंबई उपनगर येथील 1,696 प्रकल्पांच्या संख्येलाही मागे टाकले आहे. संपूर्ण पुणे विभागाचा विचार केल्यास प्रकल्पांची संख्या 3,566 पर्यंत पोहचत आहे.
महत्त्वाचे मुद्दे
पुणे जिल्ह्यात 2025-26 मध्ये 3,150 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी राज्यात सर्वाधिक
महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आकडेवारीनुसार राज्यात एकूण 10,379 प्रकल्प; रिअल इस्टेट क्षेत्रावरील विश्वास वाढत असल्याचे संकेत
मुंबई महानगर प्रदेश आघाडीवर असला, तरी वैयक्तिक जिल्हा म्हणून पुणे सर्वांत मजबूत; ठाणे व मुंबई उपनगरांना मागे टाकले