Elderly man killed Khed
राजगुरुनगर: ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे शेतातील वादातून झालेल्या मारहाणीत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. या घटनेत सोपान तुकाराम भांबुरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने खेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
शिवाजी पांडूरंग भांबुरे, किरण शिवाजी भांबुरे, आशा सुभाष भांबुरे, सोनाली किरण भांबुरे, अरुणा शिवाजी (सर्व रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत सोपान तुकाराम भांबुरे हे त्यांच्या पत्नी चंद्रकला यांच्यासह दुपारी सुमारे पावणेचार वाजता त्यांच्या 'दरा' नावाच्या शेतात होते. तेव्हा त्यांचा मुलगा रामदास भांबुरे गहू घरी नेण्यासाठी शेतात आला होता.
यावेळी भावकीतील लोकांनी घटनास्थळी येऊन संगनमताने "तुम्ही या शेतात यायचे नाही" असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर आरोपींनी सोपान भांबुरे आणि त्यांच्या पत्नीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मृत सोपान भांबुरे खाली पडल्यानंतरही आरोपींनी त्यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर सोपान भांबुरे यांना चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.